बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे साकडे

दोडामार्ग शहरातील राज्यमार्ग दुरुस्तीची केली मागणी
Edited by: संदीप देसाई
Published on: January 03, 2023 18:38 PM
views 152  views

दोडामार्ग : कसई - दोडामार्ग शहरात नगरपंचायत हद्दीतील राज्यमार्ग क्र. १८६ व राज्यमार्ग १८९ च्या झालेल्या दुरावस्थेकडे राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी निवेदन देत लक्ष वेधले आहे. या दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, असे निवेदन मंत्री चव्हाण यांना दिले आहे.

 त्यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी-बांदा-दोडामार्ग राज्यमार्ग क्र. १८६ तसेच कोल्हापूर-गोवा राज्यमार्ग १८९ हे दोन्ही मुख्य राज्यमार्ग कसई-दोडामार्ग शहराच्या मुख्य बाजारपेठेतून जातात. नगरपंचायत हद्दीतील सदरचे मुख्य रस्ते हे सद्य:स्थितीमध्ये खड्डेमय बनले असून त्यामुळे शहरातील तसेच आजूबाजूच्या नागरीकांसाठी पर्यटकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. तसेच नगरपंचायत हद्दीत मुख्य चौकातील याच राज्य मार्गालगत एमएनजीएल कंपनीकडून गॅस पाईपलाईनसाठी खोदाईचे काम सुरु आहे. या खोदाईमुळे देखील या रस्त्यांची अवस्था आणखीन बिकट झाली असून सदरच्या ठेकेदारास वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष होत आहे. तसेच शहरातील पिंपळेश्वर हॉलकडील मोरीची दुरुस्ती व राज्यमार्गालगत बॉम्बे टेक्स्टाईलकडील मोरीची दुरुस्ती होणे गरजेचे असून त्याकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनदेखील त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. तरी या सर्व गोष्टींमुळे येथील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, कृपया आपणाकडून संबधितांना कार्यवाही करणेबाबत आदेश व्हावेत, अशी विनंती लेखी निवेदनाद्वारे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केली आहे.

एमएनजीएल कंपनीने गॅस पाईपलाईनसाठी केलेल्या खोदकामाने या शहरातील नागरिक व व्यापारी वर्ग धुळीच्या साम्राज्याने हैराण होऊ लागला आहे. मात्र त्याकडे बांधकाम विभागाचेसुद्धा दुर्लक्ष होत असून नागरिकात नाराजी आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे रस्ता दुरुस्तीसाठी लक्ष वेधल्याने हा शहरवासीयांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल.