उद्याच होणार खरं चित्र स्पष्ट

युती नाहीच ? ; बंडोबांना कसं रोखणार ?
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 20, 2025 20:46 PM
views 53  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एक नगरपालिका अशा चार ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका होत असून, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवार 21 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. गुरुवारपर्यंत सहा सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी,वेंगुर्ला आणि मालवण या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत यांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तिनही ठिकाणी मिळून एकूण 77 जागा असून यासाठी एकूण 359 एवढी नाम निर्देशन पत्र दाखल झाली होती. यापैकी 300 अर्ज वैध झाले होते. तर चार नगराध्यक्ष पदांसाठी एकूण 31 अर्ज प्राप्त झाले होते यापैकी 19 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

युती नाहीच !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती झालेली नाही. मात्र कणकवली नगरपंचायतीसाठी भाजपा विरुद्ध सर्व पक्षांनी एकत्रित महाआघाडी केली आहे. उर्वरित तिनही ठिकाणी सर्वाच पक्ष स्वतंत्र लढताना दिसत आहेत. युती झाली नाही तरीही बऱ्याच ठिकाणी बंडखोरी दिसून येत आहे.ही बंडखोरी रोखून प्रत्यक्ष आप आपल्या पक्षासाठी काम करावं यासाठी सर्वच पक्षांच्या नेते मंडळींची धावपळ होताना दिसत आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवार 21 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. या एका दिवसात आप आपल्या पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी नेते मंडळींना किती यश येते हे शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट होईल.

सहा सदस्यांचे कर्जमागे, नगराध्यक्षपदाचा एकही अर्ज मागे नाही 

 अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवसापर्यंत एकूण सहा सदस्यांनी आपले   उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये सावंतवाडी नगर परिषदेमधून दोन सदस्यांनी, मालवण नगर परिषदेतील दोन, वेंगुरला नगर परिषदेतील एक अशा सहा उमेदवारांचा यात सहभाग आहे. मात्र नगराध्यक्ष पदासाठी वैध ठरलेल्या 19 उमेदवारांपैकी अद्याप एकाही उमेदवारांने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाही. आता उद्याच्या अखेरच्या दिवशी किती उमेदवार अर्ज मागे घेतात यानंतरच प्रत्येक नगरपरिषदेमध्ये दुरंगी लढती, तिरंगी की चौरंगी लढती होणार हे स्पष्ट होईल.