मुणगे आडबंदर ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 01, 2024 10:16 AM
views 73  views

देवगड : मुणगे आडबंदर येथील पाणी पुरवठा नियमितपणे सुरळीत व्हावा तसेच जलजीवन मिशन योजनेतून मुणगे - आडबंदरसाठी मंजूर झालेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी बुधवारी ग्रामपंचायत नजीक साखळी उपोषण करून या कामाबाबत मुणगे आडबंदर ग्रामथांच्या वतीने या न झालेल्या कामांची पोल खोल करण्यात आली. 

मुणगे ग्रामपंचायत कडून आडबंदर येथे होणारा पाणी पुरवठा गेले ७ महिने बंद आहे व जुनी पाईप लाईन नादुरुस्त आहे. जलजीवन मिशन योजनेतून मुणगे - आडबंदरसाठी मंजूर झालेल्या कामाचा कार्यारंभ दिनांक ०८/०२/२०२३ ला प्रस्तावित होता व काम पूर्ण करण्याचा कालावधी दिनांक २८/०२/२०२४ होता. पण अद्याप काम सुरु झालेले नाही. तीन वर्षापूर्वी मुणगे आडबंदर नळयोजनेवर ९४ लाख रुपये खर्च झाले, पण पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही  गावकऱ्यांनी मागणी करूनही त्याची चौकशी झाली नाही.जलजीवन मिशनचे काम सुरु होऊन कधी पूर्ण होणार याचे ठोस उत्तर मिळेल तेव्हाच हे साखळी उपोषण आंदोलन मागे घेण्यात येईल. असा इशारा मुणगे आडबंदर ग्रामस्थांनी दिला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हापरिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांसमवेत संवाद साधला मुणगे नळ योजना दुरुस्ती करणे हे काम मंजूर असून सदर कामाची उर्ध्व वाहिनी व साठवण टाकी हे काम 31 मार्च 2024 पूर्वी करणार असून, सदरचे काम करीत असताना पाणी पुरवठा खंडीत होणार नाही याची सर्वस्व जबाबदारी या कार्यालयाची राहील याची दक्षता घेण्यात येत आहे.

तसेच साठवण टाकीच्या पुढील वितरण व्यवस्थेची पाणी पुरवठ सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत मुणगे ह्याची राहील. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत मुणगे नळ योजना दुरुस्ती करणे या कामाची चौकशी करण्याबाबत आपण सुचवले प्रमाणे सदर कामाची चौकशी करण्यात येईल व चौकशीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर करणेत येईल सदरचे उपोषण मागे घेण्यात यावे असे लेखी पत्र सिंधुदुर्ग जिल्हापरिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी यांनी ग्रामस्थांना दिले,

 सदर पत्र प्राप्त झाल्याने ग्रामस्थांनी 31 मार्च 2024 पर्यंत साखळी उपोषण स्थगित केले आहे. 31 मार्च 2024 पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.