
कुडाळ : मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग विभागाचा ५८ वा युवा महोत्सव कुडाळ महाविद्यालयात होत आहे. मुंबई विद्यापीठाच्या एकूण ११ सांस्कृतिक विभागांपैकी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहभाग हा शंभर टक्के असतो. जिल्ह्यातील सर्व ४२ महाविद्यालये या महोत्सवात सहभागी होतात, असे गेली चार वर्षे होत असून सिंधुदुर्ग विभागाचा प्रतिसाद सर्वात मोठा असतो, हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे यांनी कुडाळ येथे महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी काढले.
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाला या महोत्सवाचे यजमान पद मिळाले असून, महाविद्यालयात दोन दिवशीय या युवा महोत्सवाला शुक्रवारी मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. युवा महोत्सवाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सांस्कृतिक विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक, सह समन्वयक डॉ. नितीन वळंजू, क.म.शि.प्र. मंडळाचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे, उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सरकार्यवाह आनंद वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, सारस्वत बँकेचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे क्लस्टर हेड, योगेश ठाकूर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. मंगेश जांबळे आदींसह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. निलेश सावे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या युवा महोत्सवातील सहभागांचा विशेषत्वाने उल्लेख केला. तसेच याप्रसंगी स्पर्धेत सहभागी होताना निकोप मनोवृत्तीने सहभागी होऊन दुसऱ्यांचा चांगला परफॉर्मन्स देखील मोठ्या मनाने स्विकारावा असे त्यांनी सांगितले.
यंदाच्या मुंबई विद्यापीठाच्या या ५८ व्या युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांपैकी एकूण ३७७ महाविद्यालये सहभागी झाली आहेत. यात सिंधुदुर्ग विभागातून एकूण ३९ महाविद्यालय सहभागी झाली आहेत. या महोत्सव एकूण ४२ कला प्रकारांचे सादरीकरण विविध महाविद्यालयातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांकडून केले जाणार आहे. यामध्ये समुहनृत्य, शास्त्रीय नृत्य, फाईन आर्ट चे विविध प्रकार, शास्त्रीय संगीत , सुगम संगीत , कथाकथन, कथा लेखन इत्यादी प्रकार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत क. म. शि. प्र. मंडळाचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले. त्यांनी याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे आणि क. म. शि. प्र. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानून सर्व सहभागी महाविद्यालयांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा समन्वय डॉ. आशिष नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कणकवली महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांचा त्यांच्या गेल्या सलग तीस वर्षांच्या युवा महोत्सवातील सहभागाबद्दल डॉ. निलेश सावे यांच्या हस्ते विषय सन्मान करण्यात आला. सूत्र संचालन डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले. आभार सांस्कृतिक समन्वय डॉ. मंगेश जांबळे यांनी मानले. याप्रसंगी विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.