रोहा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील खांब नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम गेली अनेक वर्षांपासून सुरु असुन ते पूर्ण झाले असल्याचे भासवत या मार्गांवरील उड्डाण पुलावरील वाहतूक सुरु होणार होती. परंतु ती वाहतूक सुरु होण्याच्या आधीच उड्डाण पुलाचे काम ढासळले. निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जात असल्याचेही या प्रकरणावरून समोर आले आहे.यामुळे जणू प्रवाश्यांच्या जीवाचा खेळ मांडला आहे का?अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून उमटत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १७ वर्षांपासून सुरु असुन हे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही.बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडून दरवर्षी नेहमी रस्ता पूर्ण अशी डेडलाईन दिली जाते. परंतु रस्त्याचे काम पूर्ण काही होईना अशी अवस्था आहे.यामुळे याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला भोगावा लागत आहे. यावरून रोज मरे त्याला कोण रडे!अशी या महामार्गाची परिस्थिती झाली आहे.
खांब नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम झाल्यानंतर कोलाड बाजुकडून नागोठणे बाजूकडे जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.परंतु नागोठणे बाजुकडून कोलाड बाजूकडील कामही करण्यात आले आहे.या बाजूकडील वाहतूक काही दिवसांनी सुरु केली जाणार होती,परंतु वाहतूक सुरु होण्याच्या अगोदरच या उड्डाण पुलाची एक बाजु ढासळली आहे.यावरून ठेकेदारानी केलेले काम किती उत्कृष्ठ दर्जात्मक आणि गांभीर्याने केले आहे याची प्रचिती ढासळेलेल्या कामावरून सर्वसामान्य नागरिकांनी ओळखली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवासी वर्गात मात्र चांगलीच संतापाची लाट उसळली आहे.
मुंबई- गोवा महामार्गवरील खांब बाजारपेठेतील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले परंतु खांबकडून कोलाडकडे जाणारी वाहतूक या उड्डाण पुलावरून सुरु करण्याच्या अगोदर या पुलाचा भाग ढासलला या ढासलेल्या भागामुळे बाजूनी जाणाऱ्या वाहनचालकांसहित प्रवाशाला मोठा अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण?अशी संतप्त प्रतिक्रिया वैजिनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश महाबळे यांनी व्यक्त केली आहे.