मुंडे महाविद्यालयास मुकुंद अडेवार यांची सदिच्छा भेट

Edited by: मनोज पवार
Published on: March 29, 2025 13:33 PM
views 149  views

मंडणगड :   येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास भटके विमुक्त परिषदेचे प्रदेश कार्यवाह  मुकुंद अडेवार  यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यांच्या समवेत भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस  युवराज मोहिते उपस्थित होते. परिषदेच्या वतीने भटके विमुक्त समाजाला  मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. समाजातील भटक्या व विमुक्त  लोकांच्या सेवाकार्यात भटके विमुक्त परिषद नेहमीच अग्रेसर असते असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुकुंद अडेवार  यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी मुकुंद अडेवार  व युवराज मोहिते यांना षाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी  संस्था व महाविद्यालयाच्या वाटचालीचा थोडक्यात परिचय करून दिला. तत्पूर्वी डॉ.  शैलेश भैसारे यांनी प्रस्तावना केली.

याप्रसंगी बोलताना मुकुंद अडेवार म्हणाले की, आपल्या महाविद्यालयास भेट देण्याची संधी मला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्यामुळे मिळाली. समाजातील उपेक्षित घटकांना समतेच्या प्रवाहात आणणा-या व डॉ. आंबेडकरांचा वसा सांगणा-या संस्थेचे कार्य जाणून घेण्याचा विलक्षण अनुभव घेण्याचे भाग्य मला या भेटीच्या निमित्ताने मिळाले. संस्थेने व महाविद्यालयाने अशीच उत्तरोत्तर शैक्षणिक प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. महाविद्यालयाच्या विकासाचा चढता आलेख पाहून मनस्वी आनंद झाला. ग्रामीण व डोंगरी भागातील महाविद्यालयास अनेक अडचणी असतानाही या अडचणीवर मात करुन संस्था व महाविद्यालयाने केलेला विकास कौतुकास्पद आहे. त्यांनी महाविद्यालयाची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. 

यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी डॉ. रामदास देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.