
कणकवली : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ला जोडणारा महत्वाचा घाटरस्ता असलेल्या फोंडाघाट रस्त्यात संपूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांनाही हा रस्ता धोकादायक बनला आहे. चिखलमय झालेला हा रस्ता म्हणजे वाहनचालकांच्या अपघाती मृत्यूला आमंत्रण असून याकडे ठेकेदार दुर्लक्ष करत आहे. याला जबाबदार कोण ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केला असून ठेकदाराची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, प्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
देवगड – निपाणी राज्यमार्ग दुपदरीकरणचे काम सध्या सुरू आहे. या कामामध्ये फोंडाघाटमधील अवघड वळणे असलेल्या घाटरस्त्याचाही समावेश आहे. संबंधित ठेकदाराने फोंडाघाट मधील घाटरस्त्याचे काम सध्या सुरू केले असून वाहतूक सुरक्षिततेकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. घाटरस्त्यात पूर्णतः चिखल पसरला असून यावरून दुचाकी वाहने घसरून तसेच चारचाकी वाहनांचाही अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
या घाटरस्त्याचे काम करताना ठेकदाराची जबाबदारी आहे की वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवताना कोणतीही कचराई होता कामा नये. परंतु सध्यस्थीतीत घाटरस्त्याचे रुंदीकरण करताना तसेच गटार कामे करताना घाटातल्या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले आहे. याचा त्रास घाटातून ये जा करणाऱ्या वाहनांना होत असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. तात्काळ याबाबत वाहन सुरक्षिततेसाठी उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही पिळणकर यांनी दिला आहे










