
कुडाळ : स्मार्ट मीटर विरोधातील वीज ग्राहकांचा रोष आता वाढू लागला आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय हे स्मार्ट मीटर घरोघरी बसविले जात आहेत. या मीटरमुळे वीजबिलात दुपटीने आणि तिपटीने वाढ होऊन ग्राहक हैराण झाला आहे. आता हे स्मार्ट मीटर बसवून घेणार नाही अशी भूमिका वीज ग्राहकांनी घेतली आहे. त्या बाबत सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून आज महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित राख यांची आज भेट घेण्यात आली. महावितरण जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवून जिल्ह्यातील ३ लाख ६० हजार वीज ग्राहकांचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ करत आहे असा आरोप यावेळी संघटनेकडून करण्यात आला आहे. हा अन्याय थांबला नाही तर वीज ग्राहकांचा प्रक्षोभ होऊ शकतो आणि त्याला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार असेल असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान येत्या पंधरा दिवसात महावितरणच्या स्वतंत्र संचालकांसोबत ओरोस येथे ग्राहकांची स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे वीज ग्राहक संघटनेचे नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले.
याबाबतचे निवेदन वीज ग्राहक संघटनेकडून महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित राख याना देण्यात आले. त्या निवेदनात म्हटले आहे, आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग गेली ३ वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली वीज ग्राहकांच्या न्याय, हक्क व अधिकारांसाठी निरंतर कार्यरत आहोत. यापुर्वी सुध्दा आपल्या महावितरणाच्या, जिल्हा / तालुका कार्यालयात ग्राहकांना भेडसावणाऱ्या असंख्य अडचणीबाबत ५० पेक्षा अधिक निवेदने दिलेली आहेत. परंतू सिंधुदुर्ग परीमंडळातील ९०% अधिकारी / कर्मचारी यांच्या वागण्या-बोलण्यात किंचितही बदल किंवा फरक पडलेला नाही याचा आम्ही पुन्हा एकदा जाहीर निषेध करीत आहोत. आपल्या चुकीच्या/मनमानी/तुघलुकी कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हयातील पिडीत वीज ग्राहकांनी आता निर्णायक लढाई व स्वतःच्या न्याय, हक्कांसाठी टोकाचा कायदेशीर संघर्ष करण्याची आर्थिक, मानसिक व शारिरीक तयारी सुरू केलेली आहे. याची आपण अधिक्षक अभियंता या नात्याने गांभीर्याने नोंद घ्यावी असा लिखित इशारा आपल्याला या निवदेनाव्दारे आपणास आजच सर्वांसमक्ष देत आहोत.
सर्वात महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न म्हणजे आपल्या कार्यालयाकडून जबरदस्तीने लावण्यात आलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून पुर्ववत जुने मीटर प्रत्येक ग्राहकांच्या घरी न लावल्यास पुढील गंभीर परीस्थितीला आपणच जबाबदार असणार याचे भान ठेवावे. जुने मीटर असताना येणारे किरकोळ बील आता हजारोंच्या आकड्यात येत असून कोणत्याही सामान्य ग्राहकाला तुम्ही शांत डोक्याने चालू केलेली लुटमार परवडणारी नाही. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीप्रमाणे २४ तास अखंडीत वीजपुरवठा यापुढे दिवाळी या प्रमुख सणाच्या पार्श्वभुमीवर चालू न ठेवल्यास जिल्हयात वीज ग्राहकांचा स्फोट किंवा प्रक्षोभ किंवा आक्रोश होऊ शकतो आणि या सर्व प्रसंगांना आपण व आपले महावितरण कार्यालय जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान येत्या १५ दिवसात महावितरणच्या स्वतन्र संचालक श्रीमती केळकर मॅडम या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. त्यावेळी त्या ओरोस येथे वीजग्राहकांसोबत बैठक घेणार आहेत. त्या बैठकीला सर्वानी उपस्थित राहावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जिल्हाध्यक्ष संजय लाड, कणकवली अध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी, व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संजय भोगटे,व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, जयराम वायंगणकर, तुकाराम म्हापसेकर, मंथन गवस, समीर शिंदे, रामचंद्र राणे, आशिष पाडगावकर, विनायक जांभेकर, चौकेचे सरपंच पी.के चौकेकर आदी वीज ग्राहक आणि पदाधिकारी उपस्थित होते.










