
सावंतवाडी : जिल्ह्यातील विविध अपघातात अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना आता काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कारण सावंतवाडी व कणकवली येथील दोन्ही उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणा लवकरच बसविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान याबाबत सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी अधिक दुजोरा दिला आहे.
शासनाकडून १०८ रुग्णवाहिकेच्या धर्तीवर ही यंत्रणा उभारली जाणार असून त्यासाठी लागणारी यंत्रणा खासगी कंपनीकडून देण्यात येणार आहे. तर त्याचे बिलसुध्दा शासनाकडून अदा करण्यात येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या दोन्ही उपजिल्हा रुग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा उभारली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना बर्याच वेळा खासगी अथवा कोल्हापूर, बेळगाव, गोवा बांबोळी येथे हलवावे लागत होते. परंतू या निर्णयामुळे आता दोन्ही रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणा उपलब्ध होणार आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा शासनाचा मानस आहे. त्या दृष्टीने बुधवारी येथील दोन्ही उपजिल्हा रुग्णालयात जागा निश्चिती करण्यात आली.
दरम्यान, याबाबत डॉ. दुर्भाटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, शासनाकडून राज्यातील काही जिल्ह्यात अत्यावश्यक ठिकाणी ही यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात पहील्या टप्प्यात २२ जिल्ह्यांचा समावेश आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच संबधित कंपनीची टीम सावंतवाडीत येवून गेली. त्यांनी या ठिकाणी पाहणी केली असून जागेची निश्चिती केली आहे. येत्या काही महिन्यात या ठिकाणी ही यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले तंज्ञत्र व डॉक्टर संबधित ठेकेदार कंपनी उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर ही सेवा रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांसाठी मोफत असणार आहे. त्याचे बिल थेट शासनाकडून अदा करण्यात येणार आहे. तसेच एखादा रुग्ण खासगी रुग्णालयातून आल्यास त्याला मात्र आपले बिल द्यावे लागणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा फायदा अनेक रुग्णांना होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत उपचारा अभावी प्रवास करणारे अनेक जीव यामुळे वाचणार आहेत, असा विश्वास दुर्भाटकर यांनी यावेळी व्यक्त केला.