पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा ; रोजगार विभागाचा पर्यटन व्यावसायिक महासंघासोबत सामंजस्य करार

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 27, 2023 19:01 PM
views 94  views

मालवण : कोकणातील पर्यटन क्षेत्रात काम करीत असताना कुशल कामगार आवश्यक असून हॉटेल साठी रिसेप्शन, आचारी, हेल्पर, रूम बॉय, गाईड, वेटर या कामगार वर्गाची समस्या पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना कायम स्वरूपी भेडसावत असते. यासाठी राज्य सरकारच्या वतीने शासनाच्या पोर्टलवर रोजगार विषयी नोंद करणाऱ्या कुशल अकुशल उमेदवार पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना उपलब्ध करण्यासाठी राज्यसरकारच्या रोजगार विभागामार्फत पर्यटन व्यावसायिक महासंघा सोबत सन 23 -24 साठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यासाठी काशिनाथ घाणेकर सभागृह ठाणे येथे झालेल्या उद्योजकांच्या इंड्रस्टी मिटींगमध्ये मंगलप्रभात लोंढा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजगता मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारनामे करण्यात आले. 


यावेळी राज्य सरकारचे सदर विभागाचे प्रमुख अधिकारी पर्यटन महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर व पांडुरंग ठाकूर संयोजक पर्यटन महासंघ मुंबई उपनगर हे उपस्थित होते. सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे पर्यटन क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन कोकणातील पर्यटन क्षेत्रातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न निकाली लागणार असून पर्यटनाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असे मत पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केले असून स्थानिक रोजगार निर्मिती व पर्यटन व्यावसायिकांच्या सक्षमीकारणासाठी चालू असलेल्या उपक्रमा बद्दल पर्यटन व्यावसायिकांच्या वतीने त्यानी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.

कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजगता विभागाच्या माध्यमातून राज्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे त्यांना रोजगाराच्या स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रात काम करणाऱ्या असोसिएशन सोबत सामंजस्य करार राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले असून पर्यटन क्षेत्रात आवश्यक असलेला कामगार वर्ग कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाच्या साहाय्याने भरण्यासाठी मदत केली जाणार आहे.