
सावंतवाडी : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी यांच्यात कृषी, तंत्रज्ञान, संशोधन आणि शिक्षण यांसारख्या परस्पर हितसंबंधी क्षेत्रांमध्ये सहकार्य आणि संयुक्त उपक्रम सुरु करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ.पी.ई.शिंगारे व भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी या करारावर सह्या केल्या असून यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे हे उपस्थित होते.
कोकणातील कृषी आणि संलग्न क्षेत्रातील समस्या या राज्यातील इतर भागांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत आणि त्यामुळेच कृषी शिक्षण, स्थानिक समस्यांवर संशोधन आणि शेतकरी समुदायामध्ये सुधारित पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी दापोली, जि.रत्नागिरी येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कार्यरत आहे. तसेच यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालय असून याठिकाणी यांत्रिकी, विद्युत, संगणक व संगणक विज्ञानासारखे अभियांत्रिकी विषय शिकवले जातात.
या कराराअंतर्गत सिंधुदुर्गातील कृषी विषयक समस्या व आव्हानांवर मात करण्यासाठी विद्यापीठाला आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञान भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमार्फत पुरविण्यात येईल. जिल्ह्याच्या शेती क्षेत्रातील नवकल्पना, स्टार्टअप्स आणि उद्योजकता सुलभ होण्यासाठी उपाय योजना करणे आणि शेतीपूरक प्रकल्पांसाठी टेक्नोलॉजीचा वापर यासाठी दोन्हीही संस्था एकमेकांना सहकार्य करतील.अत्याधुनिक शेती, यंत्रसामग्री, सिंचन प्रणाली आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन यासाठी या कराराचा उपयोग होईल. संयुक्त कार्यशाळा व सेमिनार्स आयोजित करण्यात येतील. शेती तंत्रज्ञान, आयओटी प्रयोग, डेटा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन सिस्टीम विकसित करण्यासाठी भोसले टेक्नॉलॉजी विद्यापीठाला मदत करेल. तसेच शैक्षणिक उपक्रमांसाठी दोन्ही संस्था एकमेकांच्या प्रयोगशाळा, कार्यशाळा, संगणक सुविधा व अत्याधुनिक उपकरणे यांचा वापर करू शकतील. विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी मिळतील. या करारामुळे जिल्ह्यातील शेतीपूरक समस्या सोडविण्यासाठी मदत होईल तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात स्थानिक पातळीवरच रोजगाराभिमुख नवीन प्रकल्प सुरु करता येतील असा विश्वास यावेळी डॉ.शिंगारे व डॉ.बाणे यांनी व्यक्त केला.