
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ऑलिम्पियाड एक्झामिनेशन कौन्सिल यांच्यात आज एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आता जागतिक स्तरावरील प्रकल्प आणि संशोधन क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
प्रकल्प-आधारित शिक्षणावर भर या तत्वानुसार, महाविद्यालयात 'प्रोजेक्ट-बेस्ड लर्निंग' (PBL) पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आयओटी (IoT), एआय (AI), रोबोटिक्स, इलेक्ट्रिक व्हेईकल आणि एनर्जी सिस्टम्स यांसारख्या आधुनिक विषयांवर आधारित रिअल-टाइम प्रकल्प राबवले जातील. या प्रकल्पांचे मूल्यमापन थेट कौन्सिलच्या तज्ज्ञांकडून केले जाणार असून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्रे आणि शोधनिबंध प्रसिद्ध करण्याची संधी मिळेल.
केंद्र सरकारच्या 'विकसित भारत २०४७' या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी या करारांतर्गत महाविद्यालयात 'सायंटिफिक इंडिया मिशन सेल' स्थापन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे आणि त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करणे, हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. तसेच कॅम्पसमध्ये 'OEC स्टुडंट चॅप्टर' देखील सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे वर्षभर तांत्रिक कार्यक्रम, नाविन्यपूर्ण आव्हाने (Innovation Challenges) आणि नेतृत्व प्रशिक्षण आयोजित केले जाईल.
या सामंजस्य करारावर ऑलिम्पियाड एक्झामिनेशन कौन्सिलचे संचालक डॉ.आचार्य जगदीश आणि यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे ग्रामीण भागातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.










