२५ हून अधिक वीज खांब कोसळले !

बांदा अंधारात
Edited by: ब्युरो
Published on: May 22, 2024 14:58 PM
views 222  views

बांदा : वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसाने बांदा शहर व परिसरात आज सायंकाळी हाहाकार माजवीला. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी वीज वाहक तारांवर झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांची हानी झाली. शहरातील गडगेवाडी येथील भाजपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. २५ हून अधिक विद्युत खांब उन्मळून पडल्याने बांदा शहरासह पाच गावे अंधारात बुडाली आहेत. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

      आज सायंकाळी विजांच्या गडगडाटासह तब्बल दोन तास मुसळधार पावसाने शहर व परिसराला झोडपून काढले. बहुतांश ठिकाणी वीज कोसळल्याने वीज उपकरणे निकामी झालीत. वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बांदा शहराला बसला. शहरातील ज्ञानेश्वर पांडुरंग सावंत यांच्या घरावर पिंपळाचे भलेमोठे झाड पडल्याने सावंत यांचे २५ लाख रुपयाहून अधिक नुकसान झाले. घराचे लाकडी छप्पर, कौले, घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने श्री सावंत हे कुटुंबियांसह घराच्या बाहेर असल्याने बचावलेत. सुदैवाने घरात असलेली त्यांची वृद्ध आई व पुतण्या बालबाल बचावलेत. घराच्या अंगणात असलेली दुचाकी व ऍम्ब्युलन्सचे देखील नुकसान झाले.

   बांदा शहरातील विराज देसाई (गवळीटेम्ब) यांच्या घराचे पत्रे उडून १० हजार रुपये, शंकर आगलावे यांच्या घराच्या छप्पराचे १५ हजार रुपये, उर्मीला उरूमकर यांच्या घरावर काजूचे झाड कोसळून नुकसान झाले. संजय धुरी व फय्याज खतीब यांच्या घरावर वीज कोसळून वायरिंग जळाल्याने नुकसान झाले.

   इन्सुली येथे जुन्या मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद होता. नेतर्डे, शेर्ले, डेगवे, वाफोली येथे देखील अनेक घरांचे वादळी पावसाने नुकसान झाले.

   बांदा शहर व पारिसरात २५ हून अधिक वीज खांब कोसळले तसेच वीज वाहक तारांवर झाडे पडल्याने महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुख्य वीज वाहिनीत बिघाड निर्माण झाल्याने तसेच बांदा फिडर मधील वीज खांब पडल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला. सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धापातळीवर काम सुरु केले असून महावितरणची ज्यादाची कुमक मागविण्यात आली आहे. वीज गुल झाल्याने शहरातील मोबाईलची सेवा देखील विस्कळीत झाली आहे. बांदा तलाठी फिरोज खान हे नुकसानीचा पंचनामा करत आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावर कोसळलेली झाडे बाजूला करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे.