सरपंच हा गावचा मुख्यमंत्री : केंद्रीय मंत्री नारायण राणे

मालवण तालुक्यातील 240 पेक्षा अधिक आणि कुडाळ तालुक्यातील 235 पेक्षा जास्त सदस्यांचा सत्कार
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 26, 2022 11:07 AM
views 305  views

सिंधुदुर्गनगरी : सरकार कडून येणारा निधी टक्केवारीचे अर्थकारण न करता गावातील विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी खर्च व्हायला हवा, यासाठी सरपंचाचे काम व कार्य महत्वाचे असून सरपंच हा गावचा मुख्यमंत्रीच असतो. याची जाणिव ठेवा. जनसेवक म्हणून काम करा व पदाचा सन्मान ठेवून आणखी मोठे व्हा. यश मिळवण सोप असत पण ते टिकवण कठीण असत हे भान ठेवून आपली कर्तबगारीन पदावी शान वाढवा, असे भावनिक उद्गार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पडवे येथील कुडाळ, मालवण नवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलतांना काढले. 

या निवडणूकीत भाजपाच्या बाजूने सिंधुदुर्गवासीयांनी जो कौल दिला त्याबद्दलही मंत्री श्री. राणे यांनी जिल्हावासीय जनता व भाजप कार्यकर्त्यांचे कौतूक केले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे,अशोक सावंत, दत्ता सामंत, रणजित देसाई, विजय केनवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्याप्रमाणे राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री असतो तसाच गावाचा प्रमुख हा सरपंच असतो. सरपंचाने आपल्या गावामध्ये लोकांसाठी विविध योजना आणून आपला गाव विकसित केला पाहिजे.आपण लोकसेवक आहोत हे लक्षात ठेव काम केले पाहिजे. कुठेही आपले नाव टक्केवारीमध्ये येऊ नये याची दक्षता सरपंच व सदस्यांनी घेतली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ व मालवण तालुक्यामध्ये भाजप प्रणित पॅनल मधून निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात केले.जगात कोणताही साबण भ्रष्टाचाराचे डाग घालवू शकत नाही हे लक्षात ठेवून काम करा असे आवाहनही यावेळी केले.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला जे ग्रामपंचायत निवडणूकमध्ये यश आले आहे ते तुमचे आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे आहे. मी या ठिकाणी नसताना जे यश मिळाले त्यात मी समाधानी आहे. असे सांगून ज्याप्रमाणे राज्याचा मुख्यमंत्री प्रमुख असतो त्याप्रमाणे सरपंच हा गावाचा प्रमुख असतो. त्याने गावातील लोकांच्या समस्या सोडवणे त्याचे काम असते. लोकांसाठी विविध योजना राबवून गावाचा विकास करणे, तसेच शासनाच्या योजना गावांमध्ये राबवून त्याचा लाभ जनतेला देणे हे सुद्धा सरपंचाचे काम आहे. कोणत्याही प्रकारे टक्केवारीमध्ये आपले नाव येणार नाही आणि आपण बदनाम होणार नाही याकडे दक्षता घेतली पाहिजे कारण आपण लोकसेवक आहोत. एकदा लागलेला भ्रष्टाचाराचा डाग पुसण्यासाठी कोणताही जगात साबण बनलेला नाही.

शासन स्तरावरचे योजना गावापर्यंत राबवण्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करू फक्त त्याची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. जे तुम्ही आता काम करणार त्या कामावर पुढील येणाऱ्या निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे त्यामुळे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष म्हणून काम करा असे आवाहन त्यांनी केले.


खासदार विनायक राऊत यांचा घेतला समाचार

सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा खासदार शोभत नाही खासदार झाल्यापासून कोणते प्रकल्प आणले ते त्यांनी जाहीर करावे पाटबंधारे असो किंवा रोजगार निर्मितीचे प्रकल्प या जिल्ह्यात खासदार विनायक राऊत यांनी आणलेले नाहीत दोन लग्न करून स्वतःचा वैयक्तिक विकास केला असेल पण त्याचा फायदा लोकांना काय लोकांसाठी काय विकास कामे आणली ती त्यांनी सांगावीत. तसेच आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारे विकासात्मक कामे आणलेली नाही.शरीर मोठ असलं म्हणून चालत नाही सभागृहामध्ये बोलताना अभ्यास लागतो तो अभ्यास आमदार वैभव नाईक यांच्याकडे नाही.असे त्यांनी सांगून फक्त राणे कुटुंबीयांवर टीका करायची एवढेच काम त्यांच्याजवळ आहे. विमानतळालाही विरोध करणारे खासदार विनायक राऊतच त्यावेळी होते, असेही ते म्हणाले.


आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार

कुडाळ तालुक्यातील २६ ग्रामपंचायत आणि मालवण तालुक्यातील ३२ ग्रामपंचायती भाजपकडे आले आहेत. मालवण तालुक्यातील २४० अधिक आणि कुडाळ तालुक्यातील २३५ जास्त सदस्यांचा सत्कार यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल यांनी केले.