LIVE UPDATES

'त्या' ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ; बीलही रोखण्यासाठीचा ठराव

सिंधुरत्नच्या मुद्द्यावर उपसभापतींची अधिकाऱ्यांवर नाराजी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 06:26 PM
views 96  views

सावंतवाडी : इन्सुली-खामदेव नाका येथे राष्ट्रीय महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून कॉंक्रीटचे तुकडे पडत असल्याने भविष्यात या ठिकाणी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यासत जबाबदार कोण ? असा सवाल उपसभापती गौरव मुळीक यांनी उपस्थित करत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासोबतच कामाचे बिल तात्काळ रोखण्यात यावे, अशा सूचना महामार्ग विभागाच्या उपअभियंत्या वृषाली पाटील यांना केल्या. तशा प्रकारचा ठरावही सर्वांनुमते घेण्यात आला.

सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक आज सभापती सुस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव आदी उपस्थित होते. मासिक बैठकीमध्ये विभागवर झालेल्या आढाव्यात उपस्थित पंचायत समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांना विविध मुद्द्यावरून धारेवर धरले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अख्यारीत येणाऱ्या इन्सुली खामदेव नाका येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामासंदर्भात पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांनी सवाल उपस्थित करत उपअभियंता पाटील यांना जाब विचारला.

यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या दोन वेळेच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यासंदर्भातही श्री. राणे यांनी उप अभियंता पाटील यांना धारेवर धरले. मात्र, आपल्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असल्याने आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कामाच्या ताणा अभावी उपस्थित राहता आले नसल्याचे सांगत यापुढे निश्चितच मी किंवा माझा प्रतिनिधी उपस्थित राहू अशी ग्वाही दिली. तर त्या ठिकाणी उड्डाण पुलाच्या काँक्रीटचे तुकडे पडत असल्याने आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने भविष्यात या ठिकाणी अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण अशी विचारणा केली. याच मुद्द्याला धरून उपसभापती श्री. मुळीक यांनी उपअभियंत्यांना कात्रीत पकडले.

झाराप ते पत्रादेवी यादरम्यान झालेल्या रस्त्याच्या कामावर लक्ष टाकल्यास कुठेही रस्त्यावर लेवल दिसून येत नाही. या मार्गावर ऐंशीच्या स्पीडवरून गाड्या पळवल्या तर अपघात होण्याची भीती असते. या ठिकाणी रस्त्याला लेवल का मिळत नाही ? कारण काय ? असे प्रश्न केले. मात्र, यावर उप अभियंता निरूत्तर झाल्या. दरम्यान, खामदेव नाका येथील उड्डाणपुलाचे काम निकृष्ट केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासोबतच त्यांचे पूर्ण बिल रोखण्यात यावेत अशी सूचना केली. याला सर्वांनी अनुमती देत अशा प्रकारचा ठराव आजच्या सभेत संमत करण्यात आला.

तर शिक्षका अभावी शाळेतील मुलांचे नुकसान होत असल्याबाबत सदस्य उदय परिपत्ते व प्राजक्ता केळुस्कर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी अलीकडेच पंधरा शिक्षक नव्याने सावंतवाडी तालुक्याला देण्यासंदर्भात शिक्षण विभागाकने आश्वासन दिले असून ते लवकरच हजर होणार आहे. त्यानंतर शिक्षकांचा प्रश्न काहीसा मिटेल असे सभापती जाधव यांनी स्पष्ट केले.

वीज वितरण कार्याल वेंगुर्ला अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील 21 गावे जोडली असल्याने त्या त्या गावातील समस्या सोडवण्यासाठी वेंगुर्ला वारी करावी लागते तसेच या संदर्भात समस्यांच्या निवारणासाठी पंचायत समितीच्या मासिक बैठकीला अधिकारी वर्ग उपस्थित राहत नसल्याने उपस्थित सदस्यांनी नाराजी व्यक्त करत या संदर्भात अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली. यावेळी उपस्थित राहत नसल्याबाबत खुलासा करण्यात यावा अशी मागणी आपण कार्यकारी अभियंतांकडे करू अशी ग्वाही सभापतीने दिली.

आंबोलीतील बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातबारावर महाराष्ट्र शासन असे नोंद असल्याने त्या ठिकाणी शेती पंचनामे केले जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याबाबतची खंत सदस्य मायकल डिसोजा यांनी व्यक्त केली. यावर तोडगा काढण्याची मागणी केली. तर अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे पूर्ण न झाल्याने शासनाने मुदत वाढ द्यावी अशी मागणी सदस्य शरद धाऊसकर यांनी केली.

पंचायत समितीच्या भूमिपूजनाच्या विषयावर संबंधित जागा साफ करून घेण्यासंदर्भात जिल्हा परिषद उप अभियंता यांची कानउघडणी करण्यात आली. संबंधित ठेकेदाराला तात्काळ जागा साफ करण्यासाठी सूचना द्या असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तर आम्हाला नव्याने उभारण्यात येणाऱ्या पंचायत समितीच्या इमारतीच्या सभागृहात बसायचे आहे. त्यादृष्टीने हे काम झाले पाहिजे. अन्यथा, सावंतवाडी तहसील कार्यालयासारखे सात वर्ष हे काम भिजत घोंगडे राहील याची दक्षता घ्या, अशी सूचनाही पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी केली.

दरम्यान, सिंधुरत्न समृद्धी भाग एक योजनेअंतर्गत केलेल्या कामांचा फलनिष्पत्ती अहवाल देण्याची मागणी करुनही  संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती न देता दिशाभूल करत असल्याने उपसभापती गौरव मुळीक यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांना पुनश्च पत्र काढण्याचे निर्देश गटविकास अधिकारी यांना दिले. या योजनेचे अध्यक्ष असलेल्या आमदार दीपक केसरकर यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु, अधिकारी दिशाभूल करत असतील तर ते आम्ही मान्य करणार नाही. या अहवालात नेमके दडलेय ? ते आम्हाला समजलेच पाहिजे असेही श्री. मुळीक यांनी स्पष्ट केले.