मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार ?

१३ ते १५ जून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
Edited by:
Published on: June 10, 2025 19:23 PM
views 685  views

सिंधुदुर्ग : १३ जूनपासून हवेचे दाब कमी होऊन राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांना आगामी चार दिवस 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर १२ आणि १३ जून रोजी कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मान्सून सक्रिय होत आहे. त्यामुळे १२  ते १५  जूनदरम्यान कर्नाटकात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात होत आहे. कारण, हवेचे दाब १०१०  हेक्टा पास्कलवरून १००४ ते १०००  हेक्टा पास्कल इतके होत आहेत. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ७० किलोमीटर इतका वाढणार आहे. हवेच्या वरच्या थरात चक्राकार स्थिती तयार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १३ जूनपासून जोरदार पावसाचे संकेत आहेत.

असा राहील वाऱ्याचा वेग

कोकण : ताशी ५०  ते ७०  किमी ( १२ ते १५  जून)

मराठवाडा :

ताशी ४०  ते ५० किमी ( १२  ते  १५  जून)

मध्य महाराष्ट्र : ताशी ५०  ते ६०  किमी (१२  ते १४  जून)

हवेचे दाब असे होणार कमी... (हेक्टापास्कल)

९  जून :समुद्रावर हवेचे दाब - १०१० 

९ जून :

राज्यात हवेचे दाब -१०१० 

१०  जून : राज्यात हवेचे दाब - १००५ 

११  जून : राज्यात हवेचे दाब -१००४ 

१२  ते १५  जून : १०००  ते ९९८ 

जेथून मान्सूनचे आगमन झाले आहे, त्या अंदमान आणि निकोबार बेटांवरून पुन्हा वाऱ्यांनी वेग घेतला आहे. ताशी ४०  ते ५०  किमी वेगाने वारे राज्यात येत आहे. त्यामुळे राज्यात १२ जूनपासून विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

असे आहेत अलर्ट 

ऑरेंज अलर्ट : कोल्हापूर (१३ जून), कोल्हापूर घाट (१३ ), सिंधुदुर्ग (१३  जून)

यलो अलर्ट : ठाणे (१३ ), रायगड (१३ ), रत्नागिरी (१२ ,१३ ), सिंधुदुर्ग (१२ ), अहिल्यानगर (१० ), पुणे (१०  ते १३ ), कोल्हापूर (१२ ), सातारा (११ ते १३ ), सांगली (१०  ते १३ ), सोलापूर (१०  ते १५ ), परभणी (१३ ), बीड (१०  ते १३ ), हिंगोली (१२ , १३ ), नांदेड (१०  ते १३ ), लातूर (१०  ते १३ ), धाराशिव (१०  ते १३ ), अकोला (११ ते १३ ), अमरावती (११ ते १३ ), भंडारा (१०  ते १३ ), बुलडाणा (११ ते १३ ), चंद्रपूर (१० ते १३ ), गडचिरोली (१० ते १३ ), गोंदिया (१०  ते १३ ), नागपूर (११ ते १३ ), वर्धा (१०  ते १३ ), वाशिम (११ ते १३ जून), यवतमाळ (११ ते १३ )

गेले दहा ते पंधरा दिवस समुद्रावर आणि जमिनीवर हवेचे दाब १०१० हेक्टापास्कल इतके होते. दाब समान असल्याने मान्सून महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि अहिल्यानगरातच थबकला होता. मात्र, हवेचे दाब मंगळवार ( १० जून) पासून कमी होत आहेत. ते १३  ते १५  जून या कालावधीत १०००  हेक्टापास्कल यापेक्षाही कमी होतील, असे दिसत आहे. त्यामुळे मान्सूनचे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वेगाने वाहत येतील. त्यामुळे राज्यात मंगळवारपासून पावसाला सुरुवात होईल. पुढे १३ ते १५ या कालावधीत त्याची तीव्रता जास्त वाढेल. सुस्तावलेला मान्सून याच कालावधीत राज्य व्यापेल, असे चित्र दिसते आहे. असे डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे यांनी सांगितले.