माकडाचा महिलेवर हल्ला ; वनविभागाचं वेधलं लक्ष

Edited by: लवू परब
Published on: July 23, 2025 20:09 PM
views 113  views

दोडामार्ग :  घोटगे येथे एका महिलेवर माकडाने हल्ला चढविल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यात ती महिला गंभीर जखमी झाली असून वनविभागाने तिच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी. घोटगे येथील वन कर्मचारी शेतकऱ्यांशी अरेरावी करत असून त्याला योग्य ती समज देण्यात यावी व वन्य प्राण्यांनी केलेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्याकडे केली. वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मेडिकल सर्टिफिकेट द्या. नुकसानभरपाई मिळण्या साठी आम्ही तसा प्रस्ताव पाठवतो असे आश्वासन सुहास पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

घोटगे येथे माकडांनी उपद्रव माजविला आहे. हे माकड मनुष्यांवर हल्ला करत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका महिलेवर माकडाने हल्ला चढविल्याची घटना घडली होती. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी महिला पळत असता माकडाने मागून धावत येऊन तिच्या पाठीवर झडप घातली. यावेळी महिला दगडावर आपटली. या ती गंभीररित्या जखमी झाली. घरातील मंडळींनी तिला उचलून आणत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना शासकीय अनुदान मिळत असल्याने ते अनुदान या महिलेलाही मिळावे यासाठी तिचे पती शंकर दळवी यांसह शेतकरी भरत दळवी, संदिप दळवी व इतर शेतकऱ्यांनी येथील वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांची बुधवारी सायंकाळी भेट घेतली. ती महिला दररोज शेतात काम करायची. मात्र माकडाच्या हल्ल्यात ती पूर्णपणे अंथरुणाशी खिळलेली असून तिच्या कुटुंबीयांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भरत दळवी यांनी केली. इतर शेतकऱ्यांनीही ही मागणी लावून धरली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मेडिकल सर्टिफिकेट कार्यालयात आणून द्या. सविस्तर प्रस्ताव आम्ही शासनास पाठवून देऊ व आपणास नुकसान भरपाई मिळवून देऊ असे यावेळी वनक्षेत्र पाल संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.

त्या कर्मचाऱ्याची बदली करा

       घोटगे येथे कार्यरत असणारा वन कर्मचारी अरेरावी करत आहे. गवारेड्यांकडून शेत पिकांचे नुकसान झाल्यास त्या वन कर्मचाऱ्यास सांगितले असता तो थेट नुकसान भरपाई मिळणार नाही असे शेतकऱ्यांना सांगतो. शिवाय पंचनामे करण्यास टाळाटाळ करून विलंब करतो. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा या कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करा अशी मागणी भरत दळवी व शंकर दळवी यांनी केली. मी त्याला योग्य ती समज देईन व नुकसानीचे पंचनामे वेळेवर करण्यास सर्व वन अधिकारी व कर्मचारी यांना सांगेल असे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी सांगितले. समज देऊनही त्याच्या वागण्यात बदल न झाल्यास त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असेही श्री पाटील यांनी स्पष्ट केले.