
सावंतवाडी : पंचायत समितीच्या मंजूर झालेल्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या हालचालींना आता वेग आला आहे. या नवीन इमारतीचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी विद्यमान जागेवरील जुनी बांधकामे हटवणे आवश्यक असल्याने, पंचायत समितीचे कार्यालय सोमवार ६ एप्रिल २०२६ पासून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद तालुका स्कूल शाळा क्र. १ (इमारत क्र. ३) येथील हॉलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात येत आहे.
पंचायत समितीच्या नवीन भव्य इमारतीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून जुन्या इमारतींच्या निर्लेखनाचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. या जागेवर असलेली कृषी गोडाऊन आणि बांधकाम उपविभागाची इमारत निष्कासित केल्याशिवाय नवीन बांधकामाला सुरुवात करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने कार्यालय हलवण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका स्कूल शाळा क्र. १ चितारआळी, श्रीराम वाचन मंदिर जवळील इमारत क्रमांक ३ मध्ये पंचायत समितीचे मुख्य कामकाज चालेल. येथे अधिकारी-कर्मचारी बैठक व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि पाण्याची सोय पूर्ण करण्यात आली आहे. सभापती व उपसभापती यांच्या दालनांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे पुढील काही कालावधीसाठी ते शिरोडा नाका येथील कार्यालयात उपलब्ध असतील. तसेच सालईवाडा येथील जि.प. बांधकाम उपविभाग परिसरातील इमारतीतूनही त्यांचे कामकाज चालेल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे











