रत्नागिरीत 5 ठिकाणी मॉक ड्रील

Edited by:
Published on: May 07, 2025 19:29 PM
views 137  views

राजापूर :  रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी घेण्यात येणार्‍या माॅक ड्रील (रंगीत तालीम)मध्ये राजापूरचाही समावेश करण्यात आला होता त्याप्रमाणे राजापूर शहरात जवाहर चौकात बुधवारी सायंकाळी ४ वाजता प्रशासनाच्या वतीने अत्यंत यशस्वी पध्दतीने ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात आले.

केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमिवर जिल्हयात पाच ठिकाणी मॉक ड्रिल होणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी जाहिर केले होते.  

दरम्यान कोणतीही अफवा न पसरविता राजापुरात अत्यंत यशस्वी पध्दतीने हे मॉक ड्रिल करण्यात आले. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा राजापूर प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हे मॉक ड्रिल पार पडले.

या मॉक ड्रिल अतंर्गत जवाहर चौक राजापूर येथे शत्रुचा हवाई हल्ला होऊन शहरातील बसस्थानक व नगर परिषद कार्यालयीन इमारतीवर हवाई बॉम्ब हल्ला झाला. त्यावेळी शत्रुचा हल्ला झाल्याची सूचना प्राप्त होताच भोंगा (सायरन वाजवून शहरातील नागरीकांना शत्रुचा हल्ला झाल्याची सूचना करण्यात आली व सतर्क राहणेबाबत कळविणेत आले. दूरध्वनी वरुन शासकीय वरीष्ठ पातळीवर शहरात हल्ला झाल्याचे कळविणेत आले. पोलीस विभाग, ग्रामीण रुग्णालय, होम गार्ड यांना याबाबत सतर्क राहणेकामी सूचना करण्यांत आल्या.

त्यानंतर पोलीस विभागाकडून व नगर परिषद आपत्ती नियंत्रण मदत कक्षाद्वारे शहरातील व्यापारी वर्ग यांना त्यांची दुकाने बंद करणेबाबत तसेच चौकामधील नागरीक यांना सुरक्षीत स्थळी घेऊन जाणेबाबतची कार्यवाही करणेत आली.

त्यानंतर नगर परिषद अग्निशमन दलाला पाचारण करुन शहरातील बसस्थानक व नगर परिषद कार्यालयीन इमारतीजवळील इमारतीवरील बॉम्ब हल्ल्याने लागलेली आग विझविण्यात आली व त्या ठिकाणी अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित बाहेर काढणेत आले.

ग्रामीण रुग्णालय राजापूर याजकडून रुग्णवाहीका येऊन हल्ल्यात घायाळ झालेल्या नागरीकांना त्वरीत स्वयंसेवक संघटनांच्या मदतीने रुग्णालयांत स्थलांतरीत करणेत आले. 

ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे स्वयंसेवी संघटनांकडून जखर्मीना तातडीने उपचारार्थ दाखल करण्यांत आले. अशा पध्दतीने अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून प्रशासनाने हे सायंकाळी ४ ते ४ वाजुन १० मिनिटे या दहा मिनिटांच्या वेळेत कशा प्रकारे शत्रूचा हल्ला परतवू शकतो, उपायोजना करू शकतो याचे यशस्वी असे प्रात्यक्षिक केले.

राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरपरिषदेचे कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव यांना या मॉक ड्रिलसाठीचा हा आरखडा तयार केला होता.

या मॉक ड्रिल मध्ये राजापूर न. प. विभाग, तहसीलदार, पंचायत समिती, ग्रामीण रुगणालय यांसह अन्य शासकिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच राजापुरातील नागरीक, स्वयंसेवी संघटना तसेच भाजपा, शिवसेना, शिवसेना (उबाठा), बजरंग दल आदींच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सहभागी होत मोलाचे सहकार्य केल्याचे प्रशासनाने नमुद केले आहे.