घरफोड्या, चोऱ्या - परप्रांतीयांच्या नोंदी बाबत मनसेचं पोलिसांना निवेदन..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 02, 2023 11:17 AM
views 96  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात विशेषतं शहरात होत असलेल्या चोऱ्या घरफोड्या बाबत पोलिसांनी योग्य ती कारवाई करून चोरट्याचा बंदोबस्त करावा. मनसेने मागणी केल्या प्रमाणे अद्याप ही परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या नाहीत त्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी पोलिसांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.

मनसेच्यावतीने मंगळवारी पदाधिकारी यांनी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक खंडागळे यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. शहर तसेच तालुक्यात चोऱ्या घरफोड्याचे प्रमाण वाढत आहे. बंद घरे बंगले यांना चोरट्याकडून विशेष लक्ष केले जात असून अद्याप पर्यत एक ही घरफोडीचा तपास होऊन चोरटे जे्रबंद झालेले नाही. मनसेने मागणी केल्याप्रमाणे परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या नाहीत. बाहेरील राज्यातुन फुगे व खुर्ची विकण्यासाठी विक्रेते शहरात दाखल होत आहेत यामुळे चोरी घरफोडीसारख्या घटनामध्ये दिवसेदिवस वाढ़ होत असताना दिसत आहे.

आंबोली हे वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे त्या ठिकाणचे वाढते पर्यटन पाहता टुरिझम पोलिस ही संकल्पना राबवली गेली पाहिजे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करता होणारे अनैतिक प्रकारावर पोलिसांनी कारवाई करावी. राजरोस पणे आंबोली मार्गे दारू वाहतूक होण्याचे प्रमाण वाढले आहे त्याला आळा बसावा यासाठी त्या ठिकाणी सुसज्ज पोलिस ठाणे उभारण्यात यावे. रविवार शनिवारी वर्षा पर्यटनासाठी मोठी गर्दी होते त्यामुळे काही पर्यटक हुल्लडबाजी करताना दिसतात त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जावी. सातोळी बावळाट मार्गे दाणोली आंबोली अशा मार्गे दारू वाहतुक राजरोसपणे केली जाते त्याला आळा बसावा.

तर याच मार्गे आजरा येथे कत्तल करण्यासाठी गुरांची वाहतूक केली जाते हा मार्ग त्यांचा नित्याचाच बनला असून पोलिसांनी त्यावर कडक कारवाई करावी. शहरातील अवैध धंदे जोरात असून त्यांच्यावर देखील कारवाई केली जावी व धूम स्टाईल वाहने चालवीणाऱ्यावर आणखी कडक कारवाई केली जावी अशी मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली. यावेळी माजी शहराध्यक्ष मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, नंदू परब, निलेश देसाई, प्रणित तळकर, प्रमोद तावडे, विशाल बर्डे, उत्तम घोगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.