अनधिकृत व ओव्हरलोड वाळू वाहतूकी विरोधात मनसेचे आंदोलन

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा इशारा
Edited by: विनायक गावस
Published on: May 12, 2023 12:48 PM
views 99  views

सावंतवाडी

       सावंतवाडी तालुक्यात महसूल अधिकाऱ्यांच्या समक्ष अनधिकृत व ओव्हरलोड वाळू वाहतूक जोमात सुरु असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून वाळू वाहतूक करणारे डंपर सोडण्यात येत आहेत याप्रकरणी सावंतवाडी तहसीलदार यांना जाग आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर मनसेकडून माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन करण्यात येणार आहे.

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतुकीवर एकीकडे कारवाई होत असताना सावंतवाडी तालुक्यात मात्र महसूल विभागाकडून अनधिकृत व ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे डंपर राजरोसपणे सोडले जात आहेत. जिल्हाधिकारी यांनी अवैध वाळू वाहतुकीला चाप बसावा यासाठी सगळीकडे महसूल विभागाची भरारी पथके नेमली आहेत तशीच पथके सावंतवाडी तालुक्यातील ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत मात्र त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना देखील वाळू माफिया, लोकप्रतिनिधी व तहसीलदार यांच्या आशीर्वादाने बऱ्याच वेळा कारवाई न करता डंपर सोडुंन देण्याचे प्रकार सुरु आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला सावंतवाडी महसूल यांनी केराची टोपली दाखवली सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे महसूल विभागाने पकडलेले पाच डंपर तालुक्यातील बड्या अधिकाऱ्याने फोन करताच सोडून देण्याचा प्रकार गुरुवारी घडला त्यात काही लोकप्रतिनिधी यांचा हि डंपर होता. त्या प्रकारबाबत दिवसभर शहरात उलटसुलट चर्चा होती. तालुक्यात तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आलेले भरारी पथके तर वाळू माफियाकडून ठरलेले हफ्ते घेऊन रात्रीच्या वेळी डंपरवर कोणतीही कारवाई न करता ते सोडून देत आहेत त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे असा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला असून सावंतवाडी तहसीलदार यांना जाग आणण्यासाठी मनसे तर्फे लवकरचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे उपरकर यांनी सांगितले.