
सावंतवाडी : वाढलेले तापमान, रणरणत्या उन्हात जीवाची लाहीलाही होत असताना मळगाव गावात वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे गावातील वीज ग्राहक प्रचंड संतापले असून गावात कमी दाबाने वीज पुरवठा सुरू आहे. यामुळे विद्यूत उपकरणांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मागेही मळगाव मध्ये अशीच घटना घडून मोठ्या संख्येने घरगुती विद्यूत उपकरणे निकामी झाली होती. तरी यातून महावितरणने कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे असला प्रकार होत असताना दुसरीकडे व्यापाऱ्यांचेही नुकसान होते आहे. अत्यंत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने गावातील व्यापारसुद्धा डबघाईस येत आहेत. असे असताना या ग्राहकांकडून वीजबिल सक्तीने वसूल केले जाते. म्हणजे सुमार दर्जाची सेवा असूनही बिल मात्र पूर्ण त्यामुळे गावातील व्यापारी वर्गही नाराज आहे.
घरगुती वापराचे बोलायचे झाल्यास घरगुती पाण्याचे पंपसुद्धा व्यवस्थित चालत नसल्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ होत आहे. तंत्रज्ञानामुळे कमी वॉटचे दिवे आल्याने तेवढे बरे आहे. कमी दाबातसुद्धा प्रकाशाच्या प्रश्न तेवढा गंभीर नाही. पण, विजेच्या लपंडावाने या दिव्यांचे जीवनमानसुद्धा धोक्यात येत आहे. वीजमंडळाच्या या भोंगळ कारभाराकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी थोडा वेळ काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.