
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आता म्हणत आहेत की १४ ऑगस्ट रोजी आंबोली, चौकुळ, गेळे कबुलायतदार प्रश्नी मुख्यमंत्र्यांशी बैठक आहे. तिथे पुन्हा ह्या प्रश्नावर, जमिन वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे.याचाच अर्थ हा प्रश्न सुटला,निकाली लागला आणि तो त्यांनी स्वतः सोडवला असं खोटं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारे केसरकर जनतेची दिशाभूल कशी करत होते हे आता उघड झाले आहे असा टोला उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी हाणला. ते म्हणाले, मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल, कबुलायतदार प्रश्न, युवकांना रोजगार देण्याचा मुद्दा सगळ्याच बाबतीत दीपक केसरकर यांनी काहीच केलं नसल्याचे स्पष्ट होत आहे. स्वतःचा आर्थिक विकास मात्र त्यांनी झपाट्याने करून घेतला आहे. पण, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत असं मत डॉ. परूळेकर यांनी व्यक्त केले.