
दोडामार्ग : दोडामार्ग मध्ये जो प्रकार घडला तो संपूर्ण जिल्ह्यात कुठेही घडता कामा नये याची दक्षत घेतली जाईल. राजकीय टीका टिपणी करायची ही वेळ नाही. आपले कार्यकर्ते सुखरूप बाहेर आल्यानंतर मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन झालेल्या आरोपांना योग्य पद्धतीने उत्तर देणार आहे. काही लोकांच्या भरपूर गोष्टी माझ्या कानावर आले आहेत. त्या सर्व गोष्टी मी जनतेसमोर ठेवणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
मांस वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कार जाळपोळ प्रकरणा नंतर भाजपचे कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस यांसहित अन्य तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर तालुक्यातील वातावरण तंग झाले होते. शेकडो कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालया समोर मोठा जमाव केला होता. कडक पोलिस बंदोबस्त सहित साटेली भेदशी, दोडामार्ग मध्ये नाक्या नाक्यावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याच रात्री पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्याला भेट दिली होती. तसेच कार्यकर्त्यांसोबत देखील संवाद साधला होता. मात्र शुक्रवारी या संशयित पाचही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना मंगळवार पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर तालुक्यातील वातावरण आहे तंग होते. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्याला पुनश्च भेट दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्याशी चर्चा केली. यावेळी देखील तहसील कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांना मोठा जमाव उपस्थित होता. चर्चा आटोपून बाहेर येताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, आजच्या घडीला मी राजकीय टीका टिपणी किंवा राजकीय उत्तर देण्यास बांधील नाही. यासंबंधी न्यायालयात केस चालू आहे. न्यायालयात खटला चालू असताना त्यात कुठलाही अडथळा येणार नाही असे वक्तव्य मी अजिबात करणार नाही. आमचे कार्यकर्ते नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी हिंदुत्वासाठी आणि दोडामार्गच्या भविष्यासाठी जे काय योगदान दिलेले आहे. हे चित्र जेव्हा स्पष्ट होईल त्यानंतर मी एक वेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषद घेणार आहे. त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यात चाललेली सगळी वस्तुस्थिती सांगण्याचं काम करणार आहे. नक्कीच सगळ्या आरोपांचं उत्तर मी त्या पद्धतीने देणार आहे. तालुक्यातील भरपूर माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे. सगळ्याच गोष्टी योग्य वेळी बाहेर काढण्यासारखे आहेत. त्या गोष्टी मी काढणारच आहे. आज जी घटना घडलेली आहे अशी घटना भविष्यात दोडामार्गच काय तर संपूर्ण जिल्ह्यात देखील घडता कामा नये याची काळजी मी माझ्या परीने घेणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, भाजपा माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, तालुका उपाध्यक्ष सुनील गवस, महिला तालुकाध्यक्ष दीक्षा महालकर, नगरसेविका संध्या प्रसादी यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
या घटनेनंतर दोडामार्ग तालुक्यात पोलिस फौज मोठ्या प्रमाणात उतरल्यानंत तालुक्याला छावणीचे स्वरूप आले. ठीक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. तालुक्याचे मुख्यालय तहसीलदार कार्यालयासमोर दोन्हीं गेट बंद करून पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला. महसूल कार्यालयाच्या इमारतीत पोलिस कार्यालय असल्याने आणि कडक बंदोबस्तामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावावा लागला. ओळखपत्र दाखविल्या शिवाय पोलिस कोणालाही आतमध्ये सोडीत नव्हते. याबाबत मंत्री राणे यांनी विचारले असता ते म्हणाले आता यापुढे असे काही होणार नाही. वातावरण तंग आहे असा काही प्रकार नाही. मी स्वतः जिल्हा पोलिस अधिक्षकांनी बोललो आहे. त्यामुळे कोणाही नागरिकांची परवड होणार नाही असेही त्यांनी सांगितले.










