
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात हेवाळे पंचक्रोशीत हत्ती प्रश्न गहन असून त्यांचा बंदोबस्त न केल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते, याकडे शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असून उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी याभागातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी पत्रकार परिषद घेत आपली आक्रमक भूमिका मांडली होती. यात शासनाला जर या हत्तींचा बंदोबस्त करता येत नसेल तर आम्हाला गोळ्या घालण्याची परवानगी द्यावी तसेच ३० मार्चची डेड लाईन देत नुकसान भरपाई नको आता हत्ती मुक्त अभियान राबवा अशी मागणी केली होती. तसेच "गणपती बाप्पा मोरया" अभियान वनविभाग कार्यालयाच्या पुढ्यात राबवणार असल्याचे म्हटले होते. यावर स्थानिक आमदार व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर एँक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी थेट वनमंत्र्याना पत्र लिहीत हत्ती प्रश्नी स्थानिक ग्रामस्थ, संबंधित अधिकारी तसेच हत्ती विषयीचे तज्ञ लोक यांची बैठक लावावी व कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.