मंत्री केसरकरांनी दोडामार्ग वासियांना दाखविले स्वप्नांचे गाजर : बबन साळगावकर

Edited by: संदीप देसाई
Published on: April 28, 2024 15:47 PM
views 196  views

दोडामार्ग : स्वप्नवत विकासाची आणि अनेक प्रकल्पांची मंत्री व या भागाचे आमदार दीपक केसरकर यांनी स्वप्न दाखवून दोडामार्ग तालुक्यातील जनतेची फक्त थट्टा केली . विकास कामांच्या आश्वासनावर त्यांनी स्वप्नांचा बाजार मांडला आहे, अशी टीका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दोडामार्ग येथे केली.दोडामार्ग येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोडामार्ग कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना उबाठा उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस, राष्ट्रवादी तालुका प्रमुख प्रदीप चांदेलकर, संदीप गवस, चंदन गावकर, उल्हास नाईक, सुदेश तुळसकर, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, सागर नाईक, दशरथ मोरजकर, गौतम महाले, गुंडू, विजय जाधव, संदेश गवस आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. मतदार संघातील दोडामार्ग तालुक्याचा विकास करण्यास केसरकर अपयशी ठरलेत. त्यांनी लोकांना स्वप्नांचा बाझार दाखवत लोकांची दिशाभूल केली. त्यांना निवडून आणण्यासाठी त्यावेळी  आपण स्वतः सावंतवाडीतून मदत केली.  म्हणून ते निवडून आले, पण त्यांनी कोकणच्या हितासाठी नव्हे तर आपल्या हितासाठी वेळोवेळी पक्ष बदलले असा हल्ला चढविला.  कोरोना सारख्या कठीण काळात केसरकर यांनी मतदार संघाला वाऱ्यावर सोडले होते. अशा या स्वप्नाच्या जादूगारावर अजिबात विश्वास ठेऊ नका. उमेदवार विनायक राऊत हेच खरे जनसेवक असून त्यांनाच निवडून द्या असे आवाहन त्यांनी या पत्रकार परिषदेवेळी केल आहे.