रोट्रॅक्ट एमइएस कॉलेज ऑफ नर्सिंग तर्फे मिनी मॅरेथॉन स्पर्धा

Edited by: मनोज पवार
Published on: January 22, 2025 14:23 PM
views 160  views

लोटे : 12 जानेवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. तरुणांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंदांचा हा जन्मदिवस होय. समाज सुधारक,अध्यात्मिक नेते, तत्त्वज्ञ आणि प्रेरकवक्ते असलेले स्वामी विवेकानंद यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा हा दिवस. या निमित्ताने रोट्रॅक्ट क्लब ऑफ एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंगने महाराष्ट्रातील नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केेले होते.

शरीराचे स्वास्थ्य आजच्या या धकाधकीच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न होता. ही स्पर्धा लवेल एमआयडीसीच्या परिसरात पार पडली. दोन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा दोन टप्प्यात ती पार पडली. या कार्यक्रमास आयर्नमॅन डॉ. तेजानंद गणपत्ये ,सौ. संजना बुरटे- सरपंच असगणी,  चिंतामणी बेडेकर, अनिकेत काते- झेड आर आर  रोट्रॅक्ट क्लब लोटे,मनीष वाडकर- प्रेसिडेंट रोट्रॅक्ट क्लब लोटे,  शशांक रेडीज- प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ लोटे, तुषार खताते- मेंबर रोट्रॅक्ट क्लब लोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती  वंदनेने झाली. सर्व मान्यवरांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मिथुन दिवेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व स्पर्धेचे नियम समजावून सांगितले.

डॉक्टर गणपत्ये व प्राचार्य मिलिंद काळे यांनी फ्लॅग दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. प्रथम पाच किलोमीटर व त्यानंतर दोन किलोमीटर अशा स्पर्धा पार पडल्या. परशुराम रुग्णालयाचे डॉ.प्रदीप वासंबेकर व डॉ. संदीप गिरासे यांनी वैद्यकीय मदत पुरवली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. पाच किलोमीटर मुलांच्या गटामध्ये एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग चा शुभम देसाई प्रथम, अभिजीत पावरा द्वितीय क्रमांक, पाच किलोमीटर मुलींमध्ये प्रथम क्रमांक प्रतीक्षा केकण- समर्थ नर्सिंग कॉलेज     डेरवण, द्वितीय अर्चना जांगळे- इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाळ,  दोन किलोमीटर मुले प्रथम क्रमांक मिस्टर साहिल-सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग, तोंडवली, द्वितीय क्रमांक- संकेत जोशी- समर्थ नर्सिंग कॉलेज डेरवण, मुलींमध्ये प्रथम निकिता पवार- इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज ऑफ नर्सिंग कसाळ आणि द्वितीय सेजल जाधव- एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग,लोटे  हे सर्व विद्यार्थी विजेते ठरले. या स्पर्धेसाठी रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग दापोली, समर्थ नर्सिंग कॉलेज डेरवण, सरस्वती नर्सिंग कॉलेज तोंडवली, नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग लोवले, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाळ, एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग लोटे मधील 124 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये या स्पर्धेविषयी आपले विचार व्यक्त करताना आयर्न मॅन डॉ. गणपत्ये यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने सराव करण्याचे महत्त्व पटवून सांगितले व स्वामी विवेकानंदांनी जे स्वप्न पाहिले आहे ते यामुळेच शक्य होईल यावर भर दिला. एवढ्या छोट्या कालावधीत एवढ्या छान स्पर्धेचे नियोजन केल्याबद्दल प्राचार्य मिलिंद काळे व त्यांच्या टीमचे  विशेष कौतुक केले. मेघना गोखले यांनी आभार प्रकटन केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा सर्व कार्यक्रम  एम इ एस आय एच एस चे डायरेक्टर डॉ.श्याम भाकरे व एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य मिलिंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.