
सावंतवाडी : एकेकाळी एकमेकांचे कडवट विरोधक असणारे नारायण राणे व दीपक केसरकर एकत्र येतील अस साक्षात ब्रम्हदेवाला देखील वाटलं नसेल. पण, राजकारणात कुणी कुणाचे कायमचे वैरी नसता हे राणे-केसरकरांनी दाखवून दिलं आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील हे कोकणचे दोन बलाढ्य नेते एकत्र आले होते. आज रविवारी तब्बल पंधरा वर्षांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केसरकर यांच्या कार्यालयाला भेट दिली.
मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भविष्यात आम्ही विकासासाठी एकत्र असू असा शब्द नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दिला. दरम्यान, आमचे वाद वैचारिक होते वैयक्तिक नाही असं ते म्हणाले. राणे- केसरकर एकत्र आल्यानं विरोधकांबरोबरच महायुतीतील काही नेत्यांची देखील चलबिचल वाढली आहे. तर एकमेकांवरील टीकेची ओवी ऐकणारी जनता मात्र या भेटीवर 'मिले सुर मेरा तुम्हारा' असं म्हणत आहे.