मिलाग्रीसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वेदिका परब यांच्या हस्ते गौरव !

Edited by: भरत केसरकर
Published on: January 07, 2024 11:36 AM
views 110  views

सावंतवाडी : ज्या शाळेत शिकलो आणि ज्या शाळेने मोठं केलं त्याच शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना बक्षीस देताना आपल्याला फार आनंद होत आहे. त्यांचा गौरव करताना मला माझ्या शालेय जीवनातील दिवस आजही आठवत आहेत. आजचा हा क्षण माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. याशिवाय दुसरा कुठलाच आनंदाचा क्षण असू शकत नाही. त्यामुळे मला घडवणाऱ्या शिक्षकवृंदाना मी खूप धन्यवाद देते, असे प्रतिपादन मिलाग्रिस हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी आणि  उद्योजिका सौ. वेदिका विशाल परब यांनी केले.

      सावंतवाडीतील मिलाग्रिस हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या आणि  प्रसिद्ध उद्योजिका सौ. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते मिलाग्रिस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.  वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून वर्षभरामध्ये खेळ, शिक्षण व इतर क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्याला सौ. वेदिका परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप युवा मोर्चा प्रदेशचे उपाध्यक्ष विशाल परब, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब,फादर, प्रिन्सिपल यास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. यावेळी वेदिका परब यांनी केलेल्या भाषणाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. यावेळी हजारो माजी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.