
सावंतवाडी : शहरातील मिलाग्रीस हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा बुधवारपासून मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर चिमुकल्यांच्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी करिष्मा नायर, तर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे, कॅथॉलिक पतसंस्थेचे संचालक विल्यम सालदाना, माणगाव येथील होली फॅमिली चर्चचे विल्ययम वरळीकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक रिचर्ड सालदाना, उपमुख्याध्यापिका मेबल करवालो, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका कविता चांदी, हायस्कूलच्या पर्यवेक्षिका मेघना राऊळ, शालेय समितीचे सर्व सदस्य, शिक्षक-पालक संघाचे सदस्य आदींसह प्रशालेतील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी करिष्मा नायर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या कला-गुणांचे कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली.