
सावंतवाडी : मिलाग्रीस हायस्कूल येथे पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. यामध्ये प्लास्टिक मुक्त भारत व वृक्ष संवर्धन-काळाची गरज या विषयावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये पलोमी तुळसकर या इयत्ता दहावी क मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक आला. तिचे प्राचार्यांमार्फत कौतुक करण्यात आले.
याच कार्यक्रमाचा दुसरा भाग प्रभात फेरी होती. पर्यावरण दिनानिमित्त मिलाग्रीस हायस्कूलच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शानदार प्रभात फेरीचे आयोजन केले. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये या प्रभात फेरीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तसेच मुलांनी सावंतवाडी शहरांमध्ये पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून आणि प्रभात फेरीतून वृक्ष संवर्धन तसेच पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी पटवून दिले. या कार्यक्रमासाठी मिलाग्रीस हरित सेना तसेच इको क्लबचे शिक्षक आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.