आडाळी एमआयडीसीत ऑनलाईन भूखंड वाटप रद्द

२ ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया सुरू न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा
Edited by:
Published on: September 23, 2025 19:02 PM
views 153  views

सिंधुदुर्ग : आडाळी एमआयडीसीतील शेकडो एकर विकसित भूखंड उद्योजकांना देण्याची सुरू असलेली ऑनलाईन प्रक्रिया रिअल इस्टेट, पर्यटन आणि गोल्फ कोर्सशी संबंधित खासगी प्रकल्पाला प्राधान्य देण्यासाठी अचानक रद्द करण्यात आल्याचा खळबळ जनक आरोप आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीने केला आहे.

समितीचे अध्यक्ष व आडाळीचे सरपंच पराग गावकर आणि सचिव प्रवीण गावकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात हा आरोप करत प्रशासनाला कडक ईशारा दिला आहे. “रद्द केलेली ऑनलाईन भूखंड वाटप प्रक्रिया २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पुन्हा सुरू न केल्यास आम्ही आमरण उपोषणास बसू, असं ठणकावलं आहे. हा इशारा देताना असं झाल्यास होणारे परिणाम आणि ते करू नये म्हणून काय करता येईल याचे पर्याय ही यावेळी गावकर यांनी सांगितले आहेत. 

५२ उद्योजकांची अडचण - आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योग उभारण्यासाठी ५२ उद्योजकांनी आधीच भूखंडासाठी मोबदला अदा केला आहे, मात्र काहींना अद्याप ताबा मिळालेला नाही.

ऑनलाईन विन्डो बंद : नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन भूखंड वाटप प्रक्रियेला मुंबई, गोवा, कर्नाटक यांसह अन्य ठिकाणांहून उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता ; मात्र २२ सप्टेंबर रोजी ही प्रक्रिया अचानक थांबवण्यात आली.

रोजगार निर्मितीवर परिणाम : समितीच्या मते, अनेक लघु - मध्यम उद्योग येथे आल्यास हजारो कुशल - अकुशल नोकऱ्यांची संधी निर्माण होऊ शकते, तर एकाच मोठ्या पर्यटन - रिअल इस्टेट प्रकल्पाला प्राधान्य दिल्यास हा रोजगाराचा लाभ मर्यादित राहणार आहे.

तिलारीत पर्यटन प्रकल्प समितीने हा सांगितला पर्याय : 

कृती समितीने सुचवले आहे की, पर्यटन आणि गोल्फ कोर्ससारखे प्रकल्प तिलारी धरण परिसरात राबवले जावेत. तेथील तरुणांनी यासाठी दीर्घकाळ मागणी केली असून तिलारी परिसर पर्यटनासाठी अधिक योग्य असल्याचे समितीचे मत आहे. “आडाळीत उद्योग व तिलारीत पर्यटन प्रकल्प यायचे असल्यास तालुक्याचा सर्वांगीण विकास साधता येईल,” असे समितीकडून स्पष्ट करण्यात आलेय.