दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थी - मुख्याध्यापकांचा सन्मान | वेंगुर्ला तालुका शिवसेनेचे आयोजन

Edited by: दिपेश परब
Published on: July 17, 2023 21:40 PM
views 102  views

वेंगुर्ला : शिक्षक हा अतिशय मेहनतीने प्रत्येक विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करतो. आणि म्हणूनच महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा १० वी व १२ वीच्या परीक्षेत अग्रेसर राहिला आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिक्षण तज्ञांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळव यासाठी व शिक्षणाच्या प्रगतीसाठी मंत्रिमंडळात निर्णय घेत आहेत. आणि यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या दर्जेदार शिक्षणाचा फायदा घेऊन आपली प्रगती साधावी असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी वेंगुर्ला येथे केले. 


महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या १८ जुलै रोजी होत असलेल्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी (१७ जुलै) रोजी वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील सर्व १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व तालुक्यातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेकी विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, सन्मानचिन्ह व फळझाड देऊन तर मुख्याध्यापकांना सन्मानचिन्ह व फळझाड देऊन सन्मान करण्यात आला. 

यावेळी व्यासपिठावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. मुश्ताक शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, रोटरीचे अस्टिटंट गर्व्हनर संजय पुनाळेकर, शिवसेना जिल्हा समन्वय सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, तालुका संघटक बाळा दळवी, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, विभागप्रमुख संजय परब आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव होणे हे पालकांबरोबरच आम्हा प्रशासनाला अभिमानास्पद आहे.  गेली ९ वर्षे दहावी बारावी निकालात राज्यात सर्वात अव्वल सिधुदुर्ग आहे आणि हे श्रेय शिक्षक व मुख्याध्यापकांचे आहे. हे सातत्य भविष्यातही टिकवून ठेऊ. ज्या समस्या आहेत शिक्षण मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून सोडविल्या जातील. असा विश्वास यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांनी व्यक्त केला. तर आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धापरिक्षांकडे जात नसल्याने अधिकारी होण्याची संख्या आपल्या जिल्ह्यातून कमी असल्याची खंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. मुश्ताक शेख यांनी व्यक्त करीत शाळेतून मुलांकडून स्पर्धापरिक्षांची तयारी करुन घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करा आणि ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करा असे आवाहन केले.

करिअरचे मार्ग खुप आहेत, ते निवडण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे. तुम्हाला जे क्षेत्र आवडते तेच क्षेत्र निवडा. पालकांनीही मुलांच्या आवडीनुसार क्षेत्र उपलब्ध करुन द्यावे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संघर्ष, संयम आणि सातत्य या तीन गोष्टी लक्षात ठेवा असे आवाहन यावेळी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी केले. तर आता गरीब पालकसुद्धा मुलांच्या शिक्षणामध्ये तडजोड करीत नाहीत. त्यामुळे येथील निकाल हा चांगला असतो. लोकांच्या प्रश्नांमध्ये तातडीने लक्ष घालणारा नेता कोण असेल तर ते दीपकभाई. प्रत्येक विद्यार्थ्याला सुविधा मिळायला हव्यात यासाठी दीपकभाईंनी नियोजन केले आहे. त्यांच्या अनेक चांगल्या योजना आहेत. त्यामुळे राज्यातील शाळांना चांगले दिवस येणार असल्याचे संजय पुनाळेकर यांनी सांगितले. 

राज्यात अनेक मंत्री, सामाजिक कार्यकर्ते आहेत, परंतु, गेले २५ वर्षे दीपक केसरकर हे आमदार, मंत्री म्हणून सातत्याने या जिल्ह्यासाठी २४ तास कार्यरत आहेत. केसरकर यांनी गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय राज्याच्या हितासाठी घेतले आहेत. शिक्षणाच्या जबाबदारी बरोबरच गोरगरिबांना मदत करणे, सामान्य कार्यकर्त्यांना भक्कम पाठिंबा देणे, महिलांना रोजगार, मच्छिमारासाठी विविध योजना करणे, पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा अनेक जबाबदाऱ्या दीपक केसरकर पार पाडत आहेत. लवकरच राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार असून यासाठी केसरकर सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सचिन वालावलकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले.