
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शिरगाव हायस्कूलमध्ये एस.एस.सी.गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न झाला. मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ. १० वी (एस.एस.सी.) परीक्षेत शिरगाव हायस्कूलमध्ये उत्तम यश मिळवून प्रथम तीन क्रमांकाने यशस्वी ठरलेल्या विद्यार्थिनींचा गौरव सोहळा सोमवार, दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता शाळेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
या गौरव सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, शाळेच्या जेष्ठ मार्गदर्शक सीमा नारायण साटम यांच्या मार्फत व हस्ते विद्यार्थिनींना रोख रक्कम, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थिनी स्वराली मेने, सई सावंत व ईशानी चव्हाण यांनी आपापल्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले असून, त्यांच्या या मेहनतीचा गौरव संपूर्ण शाळेसाठी अभिमानास्पद ठरला.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, शाळेचे मानद अधीक्षक संदीप साटम, वरिष्ठ महाविद्यालयाचे अधीक्षक सुधीर साटम, ज्ञानदेव लब्दे, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. गौरवप्राप्त विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शिक्षकांनी व संस्थेने दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले. शाळा समितीचे चेअरमन श्री कदम यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी योग्य दिशा व काळजी घेण्याचे मौल्यवान मार्गदर्शन केले.
या वेळी संदीप साटम, ज्ञानदेव लब्दे, मुख्याध्यापक आत्तार व सुधीर साटम यांनीही आपल्या विचारांद्वारे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.