तुळसमध्ये बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शन

सुजाता पडवळ यांचा उपक्रम
Edited by: दिपेश परब
Published on: September 02, 2023 19:32 PM
views 143  views

वेंगुर्ला : तुळस गावातील सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांच्या संकल्पनेतून तुळस आणि होडावडा गावातील महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने गावातील महिला बचत गटासाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आणि परिसंवाद चर्चासत्र हा कार्यक्रम १ सप्टेंबर २०२३ रोजी तुळस कुंभारटेंब येथिल सिद्धीविनायक मंगल कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कर्ज विभाग अधिकारी मंदार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी उपस्थित बचत गटांच्या महिलांना महिला विकास कक्ष प्रमुख नमिता खेडेकर यांनी महिलांच्या वैयक्तिक कर्ज योजना व बचत गट, उत्पादक गट, डिजीटल बँकिंग, कर्ज धोरण, ठेवींच्या योजना विषयावर, सिंधुदुर्ग उद्योजक सहयोग कक्ष प्रमुख सिद्धेश पवार यांनी विविध शासकीय योजनांची माहिती या विषयावर, मंदार चव्हाण यांनी पशुधन आणि शेती पुरक उपक्रम या विषयावर, वेंगुर्ला पंचायत समितीचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कावले आणि कुडाळ ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षक चेतन पाटकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

    यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शकांसहित सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ, होडावडा गावच्या सरपंच रसिका केळुसकर, उमेद अभियान समन्वयक सायली आंगचेकर, उमेद अभियानतुळस प्रभाग सि एल एफ व्यवस्थापक तनुजा परब आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी तुळस आणि होडावडा गावातील महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम प्रसंगी बोलताना  सुजाता पडवळ यांनी सांगितले की, आज गावा गावात बचत गटांची संख्या वाढत चालली आहे हि एक अभिमानाची बाब आहे मात्र बचत गटातील महिलाना विविध व्यवसाय चालविण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी योग्य वेळी मार्गदर्शनाची दिशा देण्याची गरज आहे. म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री धोंड यांनी केले तर आभार अश्विनी मांजरेकर यांनी मानले.  सुजाता पडवळ यांच्या या  सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.