
सावंतवाडी : १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस मुंबई विद्यापीठ, सिंधुदुर्ग उपपरिसर समाजकार्य विभागात अतिशय उस्फुर्तपणे साजरा करण्यात आला. समाजकार्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजकार्य विभागाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त यावर्षीच्या थीमनुसार (कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य) बनविलेल्या पोस्टरचे पोस्टरप्रदर्शन विभागात करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते डॉ. रुपेश पाटकर मानसोपचार तज्ञ यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. त्यांनतर डॉ.पाटकरांनी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना विविध मानसिक आजाराची ओळख करून दिली व मानसिक आजारावर कसे उपचार केले जातात याबाबत माहिती दिली. डॉ. पाटकर यांनी मानसिक रुग्ण अणि त्याचे कुटुंब यावरील त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले व मानसिक आजारी व्यक्तीबरोबर समाजकार्यकर्ता म्हणून कसे काम करावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या वर्षीच्या थीमनुसार कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य चांगले कसे ठेवता येईल याविषयी मार्गदर्शन केले.यामध्ये त्यांनी खालील विविध पैलूंचा समावेश केला.
१) मानवी संबंधांमध्ये कामाची उतरंड आड येऊ न देता सहकाऱ्यांना आदर द्या.
२) एकमेकांच्या चांगल्या गोष्टींची मुक्त कंठाने वाखाखणी करा.
३)निर्णय प्रक्रियेत सर्वाना सहभागी करून घ्या.
४)तुमच्या कनिष्ठांना त्यांची सृजनशीलता व्यक्त करायला मिळेल असे वातावरण निर्माण करा असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सिंधुदुर्ग उप परिसराचे प्रभारी संचालक श्री.श्रीपाद वेलिंग यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन केले. प्रा.माया रहाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी प्रास्ताविकमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्व आणि इतिहास सांगितला. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी प्रवीण मौले याने डॉ. पाटकर यांचा परिचय करून दिला. ऋतिक ओझरे या विद्यार्थ्याने आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम कांकड या विद्यार्थ्याने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अमर निर्मळे आणि प्रा. पुनम गायकवाड यांनी सहकार्य केले.