
मालवण : समुद्रकिनारी मच्छीमारांनी मासे सुकवणे खारवणे व विक्रीसाठी झोपड्या उभारल्या आहेत. त्या झोपड्या त्वरित हटवण्याची नोटीस संबंधित मच्छीमारांना प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे. या प्रश्नी मच्छीमारांनी आमदार निलेश राणे यांची मालवण निलरत्न निवासस्थानी भेट घेतली.
दरम्यान, प्रांताधिकार्यांशी चर्चा करून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल अशी ग्वाही देताना आपण सदैव मच्छिमारांच्या सोबत असल्याचा विश्वास आमदार निलेश राणे यांनी दिला.
निघालेला तोडगा आपण स्वतः मच्छीमारांपर्यंत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यामार्फत पोहचवू असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनावर उपस्थित मच्छीमार व व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त करत राणे कुटुंबिय नेहमीच मच्छीमारांच्या पाठिशी उभे राहत आहे. याचं विश्वासाने आम्ही आलो. असे सांगत मच्छिमारांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख दिपक पाटकर, मंदार लुडबे, भाऊ मोरजे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तर मच्छीमारांच्यावतीने विली फर्नांडिस, बाबला पिंन्टो, गोपीनाथ तांडेल, विकी चोपडेकर, ऑल्वीन फर्नांडिस, रॉकी डिसोजा, महेश दुदम, सिमरन फर्नांडिस, सागर पाटकर, संतोष देसाई, रोहित मेथर, लिनेश तांडेल, भुषण तोडणकर, नरेश हुले, आकाश हुले, किरण हुर्णेकर, योगेश काळसेकर, फ्रेंकी फर्नांडिस, भाऊ मोर्जे, हेमंत मेस्त, दत्ता धुरी, रूपेश प्रभू, अणा कदम, जॉन्सन डायस, शक्ती नागवेकर तसेच इतर उपस्थित होते.
मालवण किनारपट्टीलगत सीआरझेडचे उल्लंघन करून तसेच अतिक्रमण करून करण्यात आलेली अनधिकृत बांधकाम तात्काळ काढण्याची नोटीस प्रांताधिकारी यांनी मच्छीमारांना बजावली आहे. यात अनेक मच्छीमार कुटुंबियांना याचा फटका बसणार आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण यांची परवानगी घेतल्याचे पुरावे १५ ऑगस्ट पुर्वी प्रांताधिकारी कार्यालयात सादर करावेत. यानंतर १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता प्रांताधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित रहावे. या सुनावणीपुर्वी पुरावे अगर कागदपत्रे सादर न केल्यास आपल्याला काहीही सांगावयाचे नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे मच्छीमारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
आमदार नीलेश राणे यांच्यासमोर मच्छीमारांचे प्रतिनिधी विली फर्नांडिस, बाबला पिंन्टो, गोपीनाथ तांडेल, विकी चोपडेकर यांनी माहिती दिली. मालवण बंदर समुद्र किनारी आम्ही आमच्या व्यवसायासाठी या पूर्वी झावळ्याच्या (माडाची झावळे) झोपडी उभारलेल्या होत्या. समुद्र किनारी उभारलेल्या झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी व समुद्राचे पाणी आतमध्ये शिरुन झोपड्या सातत्याने जमीनदोस्त होत होत्या. यामुळे वारंवार नुकसान होत असे, तसेच झावळ्याची झोपडी असल्याने जाळ्यांची व साहित्याची चोरी व्हायची, सदरचे आमचे नुकसान होवु नये म्हणुन आम्ही काही प्रमाणात सुरक्षित असे बांधकाम केलेले आहे. आम्ही केलेले बांधकाम हे शासनाच्या जागेमध्ये आहे याचे आम्हांला माहिती आहे. आमचा माश्यांचा व्यवसाय समुद्र किनारी असल्याने आम्ही फक्त माशांचाच व्यवसाय करण्यासाठी सदरच्या जागेचा वापर करत आहेत. उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी आम्हांला बेकायदेशीर ठरवून स्थानिक व्यवसायीकांना अनधिकृत सी. आर. झेड मधुन बांधकाम काढण्याचा नोटीस दिल्या आहेत. आमच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी आमच्या व्यवसायाचे व आमच्या उदनिर्वाहाचे संरक्षण करण्यात यावे अशी आमची विनंती आहे. समुद्र किनारी असलेली जागा ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांची असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड जागा भाडेतत्वार देते अशी माहिती आम्हांला प्राप्त झाली आहे. तरी सदरील जागा भाडेतत्वार भेटल्यास आम्ही व्यवसायिक जागेचे भाडे शासनाच्या ठरवुन दिलेल्या नियमानुसार भरण्यास तयार आहोत. समुद्र किनारी असलेल्या व्यवसायासाठी बांधण्यात आलेली बांधकामे काढून टाकण्या पासुन संरक्षण मिळावे व आम्हां व्यावसायिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आमदार निलेश राणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
मच्छीमारांच्या प्रश्नाबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही आमदार नीलेश राणे यांना माहिती दिली. आमदार निलेश राणे म्हणाले आम्ही सदैव मच्छीमारांच्या सोबत आहोत. यापुर्वीही अशाप्रकारच्या नोटीसा आलेल्या होत्या, त्यावेळी प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला होता. आताही आम्ही प्रशासनाबरोबर बैठक घेऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. असे आश्वासन मच्छीमारांना देण्यात आले.