तोट्यातली कोकण रेल्वे, भारतीय रेल्वेमध्ये विलिन करा !

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे करणार मागणी ; लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : दीपक केसरकर
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 29, 2023 19:08 PM
views 535  views

सावंतवाडी : तोट्यात असलेली कोकण रेल्वे फायद्यात आणण्यासाठी ती भारतीय  रेल्वेमध्ये विलिन करा असा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे करण्यासाठी लवकरच मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. तर रखडलेले सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करण्यासंदर्भात रत्न सिंधू मधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.


केसरकर यांनी रखडलेले सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व तेथील विविध समस्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांच्याशी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस संदर्भात 25 मिनिटे चर्चा झाली. यामध्ये रखडलेले रेल्वे टर्मिनस काम पूर्ण करण्यासंदर्भात लक्ष वेधले असता रेल्वे कॉर्पोरेशनचे एमडी यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले. हे काम पूर्ण करण्यासाठी रत्नसिंधू मधून आवश्यक तो निधी देण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडीमध्ये सात गांड्यांना थांबा मिळण्याची मागणी आपण केली होती. परंतु, दिवसातून तीन गाड्या यामध्ये वंदे भारत व अन्य दोन गाड्या सावंतवाडीत थांबतील असे आश्वासनही रेल्वे मंत्र्यांनी दिले. दुसरीकडे रेल्वे टर्मिनसकडे येणारा रस्त्याचे काम जिल्हा नियोजन मधून करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक निधीही देण्यात येणार आहे. येथील पाण्याचा प्रश्न जीवन प्राधिकरण विभागाच्या योजनेतून मिटवला जाणार आहे तसा प्रस्ताव कोकण रेल्वेने जीवन प्राधिकरणकडे करावा अशी मागणी केली आहे.

ते पुढे म्हणाले, सद्यस्थितीत कोकण रेल्वे तोट्यात असल्याने या ठिकाणी विकासात्मक गोष्टी रखडल्या आहेत. गोवा आणि कर्नाटक राज्याने यापूर्वीच कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करा असे मागणी केंद्राकडे केली आहे. याच धरतीवर महाराष्ट्र सरकारनेही कोकण रेल्वे भारतीय रेल्वे दिल्ली करावी असा प्रस्ताव केंद्राला सादर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. त्या संदर्भात येत्या काही दिवसात कोकण रेल्वेचे एमडी यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेणार आहे. येथील प्रवासी संघटनेने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला मधु दंडवते यांचे नाव घेण्याची मागणी केली आहे. परंतु भारत सरकारकडून कुठल्याच रेल्वे स्टेशनला अशा प्रकारची नावे दिली नाहीत आणि देताही येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे मुंबईतील चाकरमान्यांना प्रवास सुलभरित्या करता यावा यासाठी मुंबईचा पालकमंत्री या नात्याने आपण केंद्रीय मंत्र्यांकडे डबल डेकर रेल्वेची मागणी केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीवर मंत्र मिळवणे शक्य होणार आहे. एकूणच रेल्वेमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसह इतर प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहेत.