
चिपळूण : शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नगर परिषदेच्यावतीने आज (बुधवार) इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचा, तसेच त्यामुळे होणाऱ्या त्रासाचा आक्रोश मांडला, तर प्राणीप्रेमींनी कायद्याचा आधार घेत भूमिका मांडली. जवळपास दीड तास झालेल्या चर्चेनंतरही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. अखेरीस, या विषयावर पुढील दिशा ठरविण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले की, भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर कायदेशीर उपाययोजना करण्यासाठी सातजणांची समिती नेमली जाणार आहे. या समितीत निसर्गप्रेमी नागरिक, तसेच शासकीय सदस्यांचा समावेश असेल. समितीच्या माध्यमातून कायदेशीर लढा देणे आणि प्रत्यक्ष उपाययोजना ठरविणे या दोन्ही बाबींवर निर्णय घेतला जाईल.
बैठकीस नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, पशुसंवर्धन अधिकारी सोनावणे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, वनपाल श्री. सावंत, पाणी विभागाचे खाडे उपस्थित होते. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक व प्राणीप्रेमी सहभागी झाले होते. नागरिकांनी आपल्या समस्या आक्रमक पद्धतीने मांडल्या, तर प्राणीप्रेमींनी कुत्र्यांवरील कारवाई कायद्याच्या चौकटीतच व्हावी, यावर भर दिला.
बैठकीस बापू काणे, मिलिंद कापडी, सुधीर शिंदे, उमेश सकपाळ, सारिका भावे, करमत मिठागिरी, राकेश दाते, अंकुश आवले, अदिती देशपांडे, रतन पवार, दादा खातू, स्वाती दांडेकर, लियाकत शहा, शितल रानडे, भाऊ काटदरे, सिद्धेश लाड, शशिकांत मोदी, संजय रेडीज, प्राजक्ता टकले, प्रियंका कारेकर, विजय चितळे, आशिष खातू, मोहम्मद फकीर, योगेश बांडागळे, भैया कदम, विजय चितळे, निहार कोवळे, महेंद्र कासेकर, मल्लेश लकेश्री यांच्यासह बहुसंख्य नागरिकांनी चर्चेत सहभाग घेतला.
चर्चा सुरू असताना काही काळ प्राणीप्रेमी व नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्राणीप्रेमी पूर्वा पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली मते मांडली. पशुवैद्यकीय अधिकारी सोनावणे यांनी कायदेशीर बाबींची माहिती दिली. तथापि, चर्चेतून ठोस निष्कर्ष निघाला नाही.
नागरिक उमेश सकपाळ यांनी भावनिक पवित्रा घेत सांगितले की, “मच्छी विक्रेते, मटन विक्रेते यांच्यामुळे कुत्र्यांचा होणारा त्रास हा गंभीर आहे. प्राणीप्रेमींनी रात्री आठ ते दहा वाजता माझ्यासोबत पाग येथे येऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी. जर मी चिपळूणच्या नागरिकांसाठी कायदा हातात घेतला तर काय शिक्षा आहे, ते मला सांगा, मी माझ्यावर गुन्हा दाखल करून घ्यायलाही तयार आहे,” असे म्हणत ते बैठकीतून बाहेर पडले.
दरम्यान, दादा खातू यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, “आम्हालाही कुत्र्यांवर प्रेम आहे. आम्ही स्वतः कुत्रे पाळले आहेत, पण शहरात वाढलेल्या हजारो भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणे शक्य नाही,” असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
शहरातील नागरिकांचा त्रास, प्राणीप्रेमींची बाजू आणि कायदेशीर अडचणी या सगळ्यांवर विस्तृत चर्चा झाली. मात्र, ठोस निर्णय न झाल्याने नागरिक निराश झाले. अखेरीस मुख्याधिकारी भोसले यांनी समिती स्थापन करून त्यामार्फतच उपाययोजना निश्चित केल्या जातील, असे सांगून बैठक संपन्न झाली.