
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध प्रकल्पांच्या आराखड्यांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचा आराखडा, सिंधुदुर्गनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान उभारण्याची योजना तसेच आधुनिक व्यापारी संकुल उभारणी यांचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. या सादरीकरणाचे समिती सदस्यांनी बारकाईने परीक्षण करत काही आवश्यक सुधारणा सुचविल्या. संबंधित बदल आठ दिवसांच्या आत पूर्ण करून सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
याशिवाय, प्राधिकरण क्षेत्रातील पायाभूत सुविधांवरही विशेष भर देण्यात आला. रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे नुतनीकरण व सुशोभीकरण तसेच इतर विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता सर्व प्रकल्प वेळेत पूर्णत्वास नेण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. बागुल, नगर विकास विभागाचे सहआयुक्त विनायक औंधकर, तहसीलदार चैताली सावंत, समितीचे अशासकीय सदस्य महेश उर्फ छोटू पारकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.










