शहीद जवान अमर रहे..! | सुभेदार सुनील सावंत यांना अखेरचा निरोप ; जनसागर लोटला !

Edited by: विनायक गावस
Published on: September 16, 2023 17:45 PM
views 609  views

सावंतवाडी : १९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे  सुभेदार सुनील राघोबा सावंत (४५, रा. कारिवडे) हे बुधवारी सकाळी पिटी परेडदरम्यान पंजाब येथे शहीद झाले. त्यांचे पार्थिव शनीवारी त्यांच्या मुळ गावी कारिवडे येथे आणण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रू नयनांनी 'शहीद जवान अमर रहे'च्या घोषणा देत सुभेदार सुनील राघोबा सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

शहीद सुनिल सावंत जाबाज सैनिक होते. त्यांनी २५ वर्ष देशसेवा केली. काश्मीर, लेह लडाख, डेहराडून, महू, राजस्थान, गुजरात, गोवा येथे मुलांना एनसीसी प्रशिक्षण देण्यासाठी २ वर्ष सेवा बजावली होती. त्यानंतर पाकव्याप्त जम्मू काश्मिर मधील ऑपरेशन विजय आणि कारगिल युद्धातही महत्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये बर्फाच्छादित सिमेवर त्यांनी एक वर्ष सेवा बजावली.  गेल्या तीन वर्षापासून ते भारतीय सैन्य दलाच्या पंजाब अभोर प्रांतात १९ मराठा बटालियन मध्ये सेवा बजावत होते. शहीद सुनिल सावंत जसे भारतीय सैन्य दलात अग्रस्थानी होते तसेच गावातील सर्व उत्सव, खेळ यांच्या आयोजनात सक्रिय असायचे. शेती कामात तरबेज असलेले सुनिल पट्टीचे पोहणारा होते. भैरववाडीतील अनेकांचे ते पाठीराखे होते. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सुनिल हे कारीवडे भैरववाडीचा हिरा होते. आपण ज्या समाजात घडलो त्या समाजासाठी काहीतरी करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्याची नेहमी घडपड असायची.


सुनिल सावंत भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना शहीद झाले. त्यांचे पार्थिव शनीवारी गावात आणण्यात आलं. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. त्यांच हे बलिदान कारीवडे गावातील तरुणांसाठी प्रेरणा आणि देशभक्तीचे उदाहरण देणार आहे. शहीद सुनिल सावंत यांचा हाच आदर्श समोर ठेऊन या गावातील युवक सुनीलला श्रद्धांजली म्हणुन सैन्यात भरती होतील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त करत आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली, युवराज लखमराजे सावंत-भोंसले, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, शिवसेशा जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग,कारीवडे सरपंच आरती माळकर, उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी सभापती मंगेश तळवणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, शिवदत्त घोगळे, हिदायत खान, गजानन नाटेकर, अण्णा केसरकर, माजी सरपंच अपर्णा तळवणेकर, आनंद तळवणेकर, अशोक माळकर आदींसह आजी-माजी सैनिक संघटनांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाचा राष्ट्रध्वज व शहीद जवान सुनील सावंत यांचा गणवेश त्यांच्या  कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. आपला एकुलता एक मुलगा देशासाठी शहीद झाला अशी भावना यावेळी त्यांचे वडील राघोबा सावंत यांनी व्यक्त केली‌. शहीद सुनिल सावंत यांच्या पश्चात पत्नी सुप्रिया, मुलगी स्नेहल, मुलगा संज्योत, वडील राघोबा असा परिवार आहे.