मविआचं महावितरणविरोधात ढोल बजाव आंदोलन !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 11, 2023 17:06 PM
views 92  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव काळात जिल्हा वासियांना आपला गणेश उत्सव काळोखातच साजरा करावा लागला असा आरोप करत महाविकास आघाडीच्यावतीने कुडाळ येथील महावितरण कार्यालयासमोर महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्या विरोधात ढोल, टाळ वाजवत आरती करत उपरोधीक आंदोलन छेडण्यात आले.


गणेशोत्सव काळात मोठ्या लाईट व्यवस्था विस्कळीत झाली, काही वेळा सोमवारी लाईट दुरुस्ती न करता जाणून-बुजून रविवारी किंवा मंगळवारी लाईट दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे जिल्हा वासियांना आपला गणेशोत्सव काळोखात साजरा करावा लागला. याला सर्वस्वी आपण जबाबदार आहात असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना शाल, हार, व उपरोधीक प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र अधीक्षक अभियंता यांनी याला विरोध केला असता आपल्याला हे स्वीकारावा लागेलच अशी भूमिका महाविकास आघाडीच्या आंदोलनकर्त्यांनी घेतली. 


 महाविकास आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर ढोल टाळ व आरती करत अनोखे आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात नगराध्यक्ष अक्षता खटावकर, कुडाळ उपनगराध्यक्ष किरण शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, काँग्रेस नेते प्रकाश जयतापकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका आफ्रिन करोल,शिवाजी घोगळे, साबा पाटकर, नझिर भाई शेख, तब्रेज शेख, विजय प्रभू, आदी उपस्थित होते.


 महाविकास आघाडीच्या वतीने अधीक्षक अभियंता यांना देण्यात आलेल्या उपरोधक प्रमाण पत्रात असे म्हटले आहे की,  कोकणात मुख्यतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव हा मुख्य सण आहे. मुंबई व देशाच्या अनेक भागातून सिंधुदुर्गवासीय चाकरमानी मोठ्या संख्येने गणेशोत्सव कालावधीत सिंधुदुर्गात येतात. यावर्षी गणेशोत्सव कालावधीत कुडाळ शहर व तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पावसाळा किंवा वादळी वारे नसताना वीज पुरवठा अनेक वेळा खंडित होण्याचा विक्रमच केला गेला. त्यामुळे गणेशोत्सव काळोखातच साजरा करण्याची परिस्थिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून करण्यात आली. ती आजपर्यंत कायम आहे. आपल्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील व्यापारी उद्योजक यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

गेल्या तीन वर्षात आपल्या अनागोंदी कारभारामुळे सिंधुदुर्ग जिल्हयातील आठ तरुणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे त्यांच्या घरातील गणेशोत्सव आनंद हिरावून घेण्याचे काम आपल्या माध्यमातून करण्यात आले. म्हणून हे सन्मान पत्र आपल्याला महाविकास आघाडी च्या माध्यमातून आम्ही देत आहोत. अशा आशयाचं प्रमाणपत्र महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले. मात्र यावेळी महाविकास आघाडी करून देण्यात आलेल्या प्रमाणपत्र व सर्वच प्रकाराबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी नाराजी व्यक्त केली.