माटवी सामान खरेदीची मळगावात लगबग

Edited by: विनायक गांवस
Published on: August 26, 2025 13:37 PM
views 39  views

सावंतवाडी : गणेश चतुर्थी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारंपरिक रिवाजाप्रमाणे गणपतीची माटवी सजविण्यासाठी माटवी सामान खरेदीसाठी आज सकाळपासून मळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी  केली होती. 

   

गणेश चतुर्थीला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. मळगाव बाजारपेठेत अगोदरच विविध प्रकारच्या सामानाची रेलचेल वाढली आहे. यात अगरबत्ती, धूप, कापूर, गंध आदी पूजेचे सामान तसेच गणपती सजावटीसाठी लागणारे रंग, मकर, भजनासाठी लागणाऱ्या वस्तू, विविध प्रकारचे पडदे आदी सामान आहे. कोकणात गणेशाची माटवी पारंपरिक रिवाजाप्रमाणे नैसर्गिक फळे, वस्तू वापरून सजविण्याची प्रथा आहे. त्यामुळे गणपतीची माटवी सजविण्यासाठी लागणारे सामान घेऊन आजूबाजूच्या गावातील विक्रेते मळगाव बाजारपेठेत दाखल झाले आहेत. कवंडळे, कांगले, नागलकुडे, हर्णा, आयन फळे, नरमा, चिपटा आदी विविध प्रकारच्या नैसर्गिक सामानाने मळगाव बाजारपेठ सजली आहे. लोकही हे सामान खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.