सावंतवाडीतील ‘माठ्याची जत्रा' ७ डिसेंबरला

Edited by:
Published on: December 05, 2023 19:11 PM
views 129  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील एकमेव जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली राजघराण्याच्या स्मशानभूमीतील ‘माठ्याची जत्रा ‘ गुरुवार ७ डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. राजेसाहेब खेमसावंत तिसरे यांच्या माठ्यात सकाळपासून धार्मिक विधी होणार असून दुपार पासून दर्शन सुरु होणार आहे. इतर जत्रा या रात्रीच्या भरतात, ही जत्रा सकाळी भरते. रात्री या जत्रोत्सवाची सांगता होते‌. 

भारतातील ४८ संस्थानांपैकी एक म्हणजे सावंतवाडी संस्थान. या संस्थानला ४०० वर्षांचा इतिहास आहे. पहिले खेम सावंत यांनी आपल्या शौर्याने आजूबाजूचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणत चराठे म्हणजेच आजची सावंतवाडी इथं राजधानीच ठिकाण ठरवून राजवाडा बांधला. तर दुसऱ्या खेम सावंत यांनी शहर वसवले. या संस्थानमध्ये भोसले कुळात अनेक कर्तृत्ववान, पराक्रमी राज्यकर्ते होऊन गेले. इ. स. १७५५ साली रामचंद्र सावंत यांच्या निधनानंतर ‌पुत्र खेम सावंत तथा राजश्री यांना राज्याधिकार मिळाला. राजश्री तिसरे खेम सावंत हे विद्याप्रेमी, विद्येची अभिरुची असलेले एकमेव राजा होते. दानशूर राजा म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी अनेक लोकांना, देवस्थानांना जमिनी व रोख रकमा दिल्या होत्या. आज संस्थानात जी इनामे चालू आहे त्यातील बरीच इनामे ही त्यांच्या काळातील आहेत. त्यांच्या काळातील एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध देवस्थान श्री देव आत्मेश्वर देवस्थान आहे. हे देवस्थान त्यांच्या कारकीर्दीतील असून मंदीरासमोरील तळीला देखील जाज्वल्य इतिहास आहे. 

खेम सावंत राजश्री हे वयाच्या ५४ व्या वर्षी २५ सप्टेंबर इ.स. १८०३ ला निवर्तले. माठेवाडा इथं संस्थानच्या पराक्रमी राजांची स्मारक उभारण्याची परंपरा आहे. याला 'माठे' असं संबोधलं जातं. याठिकाणी राजेसाहेब, सती गेलेल्या राणीसाहेब यांच्या माठी आहेत. या सर्वांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून प्रत्येक माठीची दैविकदृष्ट्या ख्याती आहे. स्त्री शक्तीचा जागर व संस्थानच्या वीर वंशजांची आठवण म्हणून  माठ्यांच्या ठिकाणी जत्रोत्सव साजरा केला जातो.

याठिकाणी असलेल्या भागीरथीदेवी सावंत भोसले यांच्या माठीत सुहासिनी पूजा करतात. या ठिकाणी पूजा केल्याने पुण्य मिळते अशी श्रद्धा असल्याने  सुहासिनी याठिकाणी  दर्शनासाठी येतात. संस्थानचे पराक्रमी राजे लखम सावंत भोसले यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी भागीरथीदेवी इ.स. १८०३ मध्ये सती गेल्या होत्या. त्यानंतर या माठीस जनतेनं दैवत्व दिल. भागीरथी देवीचे मंदिर हे तिसरे खेमसावंत भोसले यांच्या मंदिराच्या बाजूला आहे. सावंतवाडी संस्थानचे रामराजा  पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज, राजेसाहेब शिवरामराजे भोसले यांचे माठे देखील याच ठिकाणी आहेत.तिसऱ्या खेमसावंतांचे माठे हे दैविकदृष्ट्या प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी जत्रा भरते. सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील लोक या जत्रोत्सवास आवर्जून येतात. जिल्ह्यातील इतर जत्रा या रात्रभर चालतात. मात्र ही जत्रा दिवसा भरते. संस्थानच्या वीर वंशजांच स्मरण माठ्याच्या जत्रोत्सवात केल जात. सावंतवाडी शहरात होणारा हा एकमेव आणि ऐतिहासिक जत्रोत्सव आहे.