
मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘शहीद दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. रामदास देवरे उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. विष्णू जायभाये, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, श्री. बाबासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप यांच्या हस्ते महान क्रांतिकारक शहिद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. विष्णू जायभाये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. रामदास देवरे यांनी शहीददिनाचे महत्व सांगताना अनेक क्रांतिकारकांनी आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपल्या प्राणाची आहूती दिली. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अनेक क्रांतिकारकांच्या कार्याचे महत्व अधोरेखित केले. भगतसिंग,राजगुरु व सुखदेव यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या इंग्रज अधिकारी सॅण्डर्स याला ठार मारल्यामुळे त्यांना 23 मार्च रोजी लाहोर येथे फाशीची शिक्षा देण्यात आली. सदर दिवस हा ‘शहीद दिन’ म्हणून साजरा केला जातो असे त्यांनी यावेळी सांगितले.