
दोडामार्ग : “शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती, प्रेरणेची अखंड गाथा आणि हिंदवी स्वराज्याचा तेजोमय प्रकाश! निधड्या छातीचा, दणकट कणांचा, मराठी मनांचा आणि भारतभूमीचा एकच राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या त्याग, पराक्रम आणि रयतेसाठी केलेल्या कार्याला तोड नाही,” असे गौरवोद्गार दोडामार्ग नगरपंचायतीचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी काढले.
अखिल भारतीय मराठा महासंघ, शाखा दोडामार्ग यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उदय पास्ते यांच्या निवासस्थानाच्या पटांगणात आयोजित या सोहळ्यास मराठा महासंघाचे अध्यक्ष उदय पास्ते, माजी नगरसेवक दिवाकर गवस, नगरसेविका संध्या प्रसादी, नगरसेवक चंदन गावकर यांसह विजय चव्हाण, विठ्ठल दळवी, सुभाष भोळे, सुशांत गवस, पुनाजी गवस यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उत्सवस्थळी छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी शिवचरित्रावर भाष्य करत शिवरायांच्या कार्याचा गौरव केला. शिवजयंती उत्सव समिती, दोडामार्ग तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक चिमुकल्यांनी शिवरायांच्या मावळ्यांची वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. बालकांनी शिवचरित्रावर आधारित भाषणे सादर केली, तर डान्स, फॅन्सी ड्रेस आणि देशभक्तीपर सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले.
तालुक्यात उत्साहात शिवजयंती...
दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आयनोडे पुनर्वसन, सरगवे पुनर्वसन, झरेबांबर, पिकुळे, उसप, खोक्रल, तळेखोल, वीर्डी, आयी, साटेली-भेडशी, कोनाळकट्टा आदी गावांतही शिवजयंतीचे कार्यक्रम पार पडले. अनेक ठिकाणांहून शिवप्रेमींनी दुचाकी व चारचाकी रॅली काढून दोडामार्ग शहरात आगमन केले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी व शिवकालीन पोवाड्यांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
तालुक्यातील विविध ठिकाणी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शिवकालीन वेशभूषा स्पर्धा, नृत्य, फॅन्सी ड्रेस आदी उपक्रमही उत्साहात पार पडले. शिवरायांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उत्सवातून देण्यात आला.










