शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित

लाभ पूर्ववत करण्याची मनसेची मागणी
Edited by: विनायक गावस
Published on: October 04, 2023 15:32 PM
views 127  views

सावंतवाडी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना आता शासनाने महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे हस्तांतरित केली असून या योजनेतील त्रुटी व अंमलबजावणी मधील भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील असंख्य शेतकरी लाभांपासून वंचित राहिले आहेत. तत्कालीन महसुली अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे लाभ बंद झाले असून जनता प्रशासनाकडे वारंवार कागदपत्रे सादर करून अक्षरशः मेटाकुटीस आली आहे. त्यामुळे आता कृषी विभागाने या संबंधित गावोगावी प्रबोधन व जनजागृती शिबिरे आयोजित करून लाभांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करून शेतकऱ्यांना मिळणारे लाभ पूर्ववत चालू होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी अशी मागणी मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपविभागीय कृषी अधिकारी  पाटील यांची भेट घेऊन केली‌.

यावेळी सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी श्री. गोरे ही उपस्थित होते. त्याचबरोबर कृषी विभागामार्फत असणाऱ्या विविध शेतकऱ्यांसाठीच्या योजना अंमलबजावणीतील त्रुटींबाबत अधिकाऱ्यांची चर्चा केली. शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी लँड शेडिंग पडताळणी होऊन देखील अकाउंट इन ॲक्टिव्ह मोडवर असल्याने लाभांपासून वंचित राहिले आहेत. कृषी विभागामार्फत तात्काळ सदरची खाती ऍक्टिव्ह मोडवर करून लाभार्थ्यांना अनुदान रकमेचा लाभ द्यावा शेतकऱ्यांकडे केवायसीच्या नावाखाली वारंवार होणारी कागदपत्रांची मागणी बंद करावी कृषी सहाय्यकांना या योजनेबाबत परिपूर्ण प्रशिक्षण द्यावे अशा मागण्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनसे विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार प्रकाश साटेलकर मंदार नाईक विद्यार्थीसेना जिल्हा सचिव निलेश देसाई नंदू परब विद्यार्थीसेना तालुका अध्यक्ष संदेश सावंत पिंट्या नाईक विशाल बर्डे ज्ञानेश्वर नाईक आदी उपस्थित होते.