
चिपळूण : चिपळूण पोलीस ठाण्यात होमगार्ड पदावर कार्यरत असलेल्या मंजुषा मधुकर पवार यांनी आपली सेवा बजावत, कुटुंबाची जबाबदारी निभावत एल.एल.बी. (विधी शाखा) ही पदवी यशस्वीरीत्या प्राप्त केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे समाजात एक आदर्श उभा राहिला असून, त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंजुषा पवार या मूळच्या चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हणे येथील रहिवासी असून, त्यांनी नोकरीच्या शिफ्ट ड्युटी व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून नियमितपणे अभ्यास केला. अत्यंत शिस्तबद्ध आणि संयमितपणे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करत विधी शिक्षण क्षेत्रात यश मिळवले आहे.
त्यांनी एल.एल.बी. शिक्षणात मिळवलेले यश केवळ त्यांच्या वैयक्तिक कष्टाचे नव्हे, तर त्यांच्या पतीच्या पाठिंब्याचे आणि कुटुंबाच्या सहकार्याचे प्रतीक ठरले आहे. या यशामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले असून, आपल्या पतीचेही नाव गौरवाने उंचावले आहे.
मंजुषा पवार यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक महिलांसाठी आणि काम करणाऱ्या गृहिणींसाठी त्यांचे हे यश प्रेरणादायी ठरत आहे. समाजसेवा आणि विधीसेवा यामध्ये त्यांनी आता एक नवा टप्पा पार केला असून, भविष्यात त्या विधी सेवा क्षेत्रात कार्यरत होऊन समाजात न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.