
वेंगुर्ले : जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा सर्वांचे लक्ष तुमच्याकडे असते. वजराट शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी शाळेसहीत गावचे नाव उज्वल केले आहे. या शाळेची वाढती प्रगती लक्षात घेता शाळेच्या भौतिक सुविधांसाठी आवश्यक निधी वर्षभरात प्राप्त होईल, चार वर्गखोल्यासाठी सुद्धा निधी प्राप्त करून दिला जाईल. भविष्यात या शाळेचे रंगरूप बदलेल असेल अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी वजराट येथे दिली.
नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील वजराट पॅटर्नने चौकार मारला. शाळा वजराट नंबर १ चे चार विद्यार्थी इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय ग्रामीण गुणवत्ता यादीत आले. याबद्दल वजराट भाजप व ग्रामस्थांच्या वतीने या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, गावातील दहावी - बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सन्मान कार्यक्रमात मनिष दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. प्रसाद देवधर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब, वजराट गावचे डॉ. अनिकेत वजराटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेखर परब, तंटामुक्ती अध्यक्ष दादा परब, अण्णा वजराटकर, रोटरी क्लब अध्यक्ष आनंद बोवलेकर, इनरव्हील क्लब अध्यक्ष अपर्णा बोवलेकर, उपाध्यक्ष बबन कांदे, आडेली हायस्कूल शिक्षक श्री. जाधव, वजराटकर गुरुजी, श्याम परब, ग्रा. प सदस्य रसिका मेस्त्री, प्रवीण कांदे, उपाध्यक्ष जानवी कांदे, करीश्मा सोनसूरकर, वसंत परब आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम भाजपचे नितीन चव्हाण, वामन भोसले, नितीन परब, आनंद परब, रवी पालयेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय ग्रामीण जिल्ह्यात पाचवी, तालुक्यात द्वितीय आलेल्या स्वरधा अरविंद झेंडे, राज्यस्तरीय ग्रामीण जिल्ह्यात नववा, तालुक्यात तृतीय आलेल्या नीरज शेखर परब, राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक माही राजाराम घोंगे, पियुषा मिलिंद घोणे तसेच उत्तीर्ण विद्यार्थी चैतन्य प्रेमानंद सावंत-भोसले, गुरुनाथ लवु पेडणेकर, यश नरेश पालयेकर यांचा प्रसन्ना देसाई यांच्या वतीने देण्यात आलेली स्कुल बॅग व इतर शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, दहावी व बारावी उत्तीर्ण यांचा वजराट भाजपच्या वतीने शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. गावातील प्रगतशील शेतकरी शेतकरी संजय लवू केरकर यांच्यासहित मान्यवर, शाळेचे शिक्षक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक तेजस बांदिवडेकर यांनी केले.