
सावंतवाडी : सह्याद्री फाउंडेशनने तीन दिवसीय दशावतार महोत्सव आयोजित केला असुन यातून दशावतार कला जिवंत ठेवण्याचे काम ही संस्था करत आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलेला एक नवस्वरूप देण्याच्या दृष्टीने आमदार दीपक केसरकर यांनी सिंधुरत्न योजनेतून दशावतार कंपन्यांना वाहनं खरेदी करून दिली आहेत. आता पुढील काळात देखील दशावतार कलेला राजाश्रय मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न केले जातील, असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथील ज. जगन्नाथराव भोसले उद्यान येथे सह्याद्री फाऊंडेशन व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मनिष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी बेळगावचे उद्योजक प्रसन्न घाडगे, माजी नगराध्यक्ष संजू परब, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ,संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत गावडे, ॲड. परब आदी उपस्थित होते.
मनीष दळवी म्हणाले, सह्याद्री फाऊंडेशनने समाजाला आवश्यक विवीधांगी उपक्रम देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रिडा क्षेत्रात आदर्शवत काम व्हावे यासाठी सह्याद्री फाऊंडेशनचा पुढाकार राहिलेला आहे. त्यांच्या या कार्याला आमची नेहमीच साथ राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी बेळगावचे उद्योजक प्रसन्न घोडगे तसेच सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले. यावेळी त्यांनी सह्याद्री फाउंडेशनच्या कामाचा आढावा घेतला. तसेच यावेळी चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे प्रमुख देवेंद्र नाईक यांचा सत्कार करण्यात आला. तर सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव प्रताप परब, तारकेश्वर सावंत, संस्थेचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण, माजी सचिव प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, शशिकांत मोरजकर, दीपक राऊळ, गजानन बांदेकर, फाउंडेशनच्या उपाध्यक्ष मोहिनी मडगावकर, खजिनदार हर्षवर्धन धारणकर, वेर्ले उपसरपंच मोहन राऊळ, अशोक सांगेलकर, सुनील खानोलकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सिद्धेश सावंत, अनिल राऊळ, राजन राऊळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे कार्याध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी तर आभार माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नाट्यप्रेमी उपस्थित होते.